निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सात हजारांवर बॅनर्स, पोस्टर्स हटवले

21 Oct 2024 13:10:11
 
ni
 
मुंबई, 20 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेने अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सवरील कारवाईला तात्काळ सुरुवात केली. महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाने मंगळवार ते गुरुवार अशा तीन दिवसांत संपूर्ण मुंबईत एकूण 7389 भित्तिपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे काढून टाकले; तसेच नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स आदी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.
 
आचारसंहितेत विद्रूपीकरण कायदा-1995 नुसार ही कारवाई सुरू असून, सर्व राजकीय पक्षांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे; तसेच ज्या ठिकाणी परवानगी असेल त्या ठिकाणीच अधिकृत परवानगी घेऊन जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स लावावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. या काळात संपूर्ण मुंबईत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात ठेवून सातत्याने अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आदी प्रचारसाहित्य काढून टाकण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्या आहेत. सी-व्हिजिल ॲपच्या मदतीनेही मतदारांना आचारसंहिता उल्लंघनासंदर्भातील तक्रार करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
Powered By Sangraha 9.0