कोथरूडच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान : मुरलीधर मोहोळ

21 Oct 2024 13:15:44
 
 
ko
 
कोथरूड, 20 ऑक्टोबर (आ.प्र.) : ‌
 
 ‘वेगाने विकसित झालेल्या कोथरूडचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. कारण कोथरूडच्या जडणघडणीत अनेकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. देशाला, राज्यालाही कोथरूडने खूप काही दिले आहे. सर्वार्थाने कोथरूड हे संपन्न उपनगर म्हणून नावारूपाला आले आहे. दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोथरूडचे वैभव समाजासमोर आले आहे,' असे मत केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजच्या के. बी. जोशी सभागृहात मेनका प्रकाशन प्रकाशित ‌‘कोथरूड दिवाळी अंका'चा प्रकाशन सोहळा आयोजित करएयात आला होता. त्यावेळी मोहोळ बोलत होते.
 
व्यासपीठावर या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आंतरसांस्कृतिक विशेषज्ज्ञ वैशाली करमरकर, संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी, कोथरूड दिवाळी अंकाचे संपादक अभय कुलकर्णी, कार्यकारी संपादक सुकृत करंदीकर उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‌‘विद्यार्थी परिषदेचा संघटन मंत्री झाल्यापासून 1982 पासून पुणे शहराशी माझा संपर्क वाढला. पुणे पदवीधर मतदारसंघातून मी आमदार म्हणून निवडून आलो. विधानसभेवर कोथरूड मतदारसंघातून निवडून गेलो. त्यामुळे आता मी कोथरूडचा झालो आहे.
 
उपनगरांवरही दिवाळी अंक असावा, असा विचार मनात आला आणि कोथरूडवर दिवाळी अंक काढण्याचे ठरविले. अनेक वैविध्यपूर्ण घटना, गोष्टींनी कोथरूड समृद्ध झालेले आहे. त्याचेच वर्णन आणि वैशिष्ट्ये दिवाळी अंकातून टिपण्यात आली आहेत.' डॉ. सलिल कुलकर्णी म्हणाले, ‌‘अनेक कलाकार कोथरूडमध्ये राहतात. आम्हाला कोथरूडचा अभिमान आहे. परदेशांत गेल्यावरही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी चर्चा होते तेव्हा आम्ही कोथरूडचे असे ऐकल्यावरही अभिमान वाटतो'. वैशाली करमरकर म्हणाल्या, ‌‘सतत वेगळ्या वाटा शोधत राहणे हा पुण्याचा स्थायिभाव आहे. कोथरूड या उपनगरावर प्रकाशित झालेला हा दिवाळी अंक हेही पुण्याचे वेगळेपण अधोरेखित करते.'
 
मिलिंद जोशी म्हणाले, ‌‘महानगरे विकसित होत असताना अनेक घटकांना सोबत घेतात. म्हणूनच आपल्या सांस्कृतिक संचिताची माहिती असणे गरजेचे आहे. त्याद्वारेच गावाचे गावपण टिपता येते.' रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, ‌‘ग्रामीण आणि शहरीकरणासोबतच कोथरूडच्या विकासातील सर्व घटनांचा उल्लेख दिवाळी अंकात खुमासदार शैलीने करण्यात आला आहे. शिक्षण, कला, संस्कृतीसह अनेकविध घटकांचाही कोथरूडच्या विकासातील उल्लेख दिवाळी अंकात विशेषत्वाने केला आहे. त्यामुळे दिवाळी अंक वाचनीय झाला आहे.' अभय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुकृत करंदीकर यांनी आभार मानले.
Powered By Sangraha 9.0