काजाेलला सिनेमांत यायचंच नव्हत

    19-Oct-2024
Total Views |
 
 

Kajol 
 
काजाेल ही हिंदी सिनेमातली एक नॅचरल अ‍ॅक्ट्रेस. तिची आई तनुजा आणि मावशी नूतन या दाेघीही अतिशय सहज अभिनयासाठीच ओळखल्या गेल्या हाेत्या. ताेच वारसा तिने समर्थपणे चालवला. पण, सिनेमात ती अपघाताने आली. तिची अजिबात इच्छा नव्हती सिनेमात येण्याची. त्याचं कारण फारच इमाेशनल हाेतं. काजाेल लहान हाेती तेव्हा तिची आई तनुजा अतिशय बिझी अशी आघाडीची अभिनेत्री हाेती.देव आनंद, राजेश खन्ना यांच्यापासून अनेक नामवंत अभिनेत्यांबराेबर तिचे सिनेमे सुरू हाेते. ताे काळमिळेल तेवढं काम पदरात पाडून घेण्याचा हाेता.
 
त्यामुळे एकावेळी एका नटनटीचे दहाबारापंधरा सिनेमे सहज सुरू असायचे. नट मंडळी तीन तीन शिफ्ट्समध्ये काम करायची. काही बिझी अभिनेते तर पाच शिफ्ट करायचे. तनुजा सकाळी सात वाजता पहिल्या शिफ्टला जायची. दुपारी यायची, अंघाेळ करून दुसऱ्या शिफ्टला जायची.मग रात्री तिसरी शिफ्ट करायची. हे तीन वेगवेगळे सिनेमे असायचे. आपली आई किती कष्ट करते आहे, हे काजाेलला दिसायचं. शिवाय, तिला हेही दिसायचं की ती अभिनेत्री असल्यामुळे नायकाच्या तुलनेत तिला फारच कमी पैसे दिले जातात आणि अनेकदा तेही हातात पडत नाहीत. त्यामुळे तिने एखाद्या ऑफिसात नऊ ते पाच नाेकरी करण्याचाच निर्धार केला हाेता.