लेखापरीक्षकांवरील (ऑडिटर) कामाच्या वाढत्या तणावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मुंबईच्या एका कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा तणावामुळे आकस्मिक मृत्यू झाल्याने या तणावाचेही ‘ऑडिट’ करण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात.धावपळीच्या या काळात तणाव हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. विविध लक्ष्ये पूर्ण करताना मानसिकदृष्ट्या आपण किती थकताे आहाेत हे कळत असूनही थांबता येत नाही.मात्र, अतितणावाचे दुष्परिणाम हाेत असल्याने सावधगिरी बाळगणेही तेवढेच गरजेचे आहे.हा काळ आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीबराेबरच स्पर्धेचा. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी राेज तयार राहावे लागते आणि वेगाने बदलत असलेले तंत्रज्ञान तेवढ्याच लवकर आत्मसात करणे भाग असते. ताण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी ताे मर्यादेबाहेर गेला, तर मानसिक आराेग्य बिघडण्याबराेबरच शारीरिक विकार येतात.
या वेगवान काळात कामाचे तास वाढत आहेत आणि माेबाइल, लॅपटाॅपसारख्या साधनांमुळे घर-ऑफिस यांच्यातील सीमारेषा संपल्यात जमा आहे. सध्याच्या काळात लेखापरीक्षणाच्या (ऑडिट) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा खूपच ताण असल्याचे दिसले आहे. रात्री उशिरापर्यंत हे लाेक काम करण्यात गुंतलेले दिसतात. पण, याचे जीवघेणे परिणामही हाेत असल्याचे एसआर बाटलीबाेई अँड कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे दिसले. कामाच्या ताणामुळे त्याचा मृत्यू झाला. लेखापरीक्षण करणाऱ्या (ऑडिट) कंपन्या आणि फर्म्समध्ये ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची गरज असते.लेखापरीक्षणाचे काम काैशल्याचे असल्याने ताण येताेच. पण, त्याचा असा परिणाम हाेत असेल तर काय, हा मुद्दा चर्चेत आला आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या दबावामुळे कामाचा ताण वाढताे आहे.
तिमाही आणि वार्षिक लेखा निकाल जाहीर करण्यासाठी लवकर काम करून द्यावे म्हणून ग्राहकांचा लेखापरीक्षकांवर दबाव येताे. व्यावसायिकता आणि जलद सेवा म्हणून त्याकडे पाहिले जाते.काही वेळा जागतिक निकषांबराेबर जुळवून घेणे असा भागही यात असताे. ‘एखाद्या फर्म अथवा कंपनीला चाैथ्या आठवड्यात निकाल जाहीर करावयाचे असतील, तर ते त्यांना तिसऱ्या आठवड्यातच तयार झालेले हवे असतात. मात्र, कंपनीच्या हिशेब आणि अर्थ या दाेन विभागांची त्यासाठी तयारी झालेली नसल्यामुळे सगळा दबाव लेखापरीक्षकांवर येताे. आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या काळात तर ताे जास्त वाढताे,’ अशी माहिती लेखापरीक्षणाच्या क्षेत्रातील एका नामवंत कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली.
व्यवसाय चांगला चालावा आणि कामे जास्त मिळावीत म्हणून हे करणे आवश्यक असल्याचे ताे म्हणाला. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने कठाेर उपाययाेजना सुरू केल्यामुळे कंपन्यांवर अनेक बंधने असून, त्यांना अनेक बाबी जाहीर कराव्या लागतात. याचा परिणाम कामाचा बाेजा वाढण्यात झाला आहे.ग्राहकांच्या मागण्या आणि गरजांमुळे लेखापरीक्षणाचे काम गेल्या काही वर्षांत गुंतागुंतीचे झाले आहे. अनेक कंपन्यांनी विस्तार केल्याने, काहींचे विभाजन झाल्याने आणि खासगी गुंतवणूक वाढल्यामुळे लेखापरीक्षकांचे कामही वाढल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.‘डेडलाइन्स, डेडलाइन्स आणि डेडलाइन्स हा सध्याचा स्थायीभाव झाला असून, त्यातून कामाचा ताण वाढताे आहे,’ असे ‘एमजीबी अॅडव्हायजर्स’चे भागीदार जितेंद्र भंडारी यांनी सांगितले.
मात्र, कामातील जाेखीमीचे जास्त प्रमाण, कामाचे जास्त तास आणि कमी वेतनामुळे नवीन सनदी लेखापाल (सीए) लेखापरीक्षणाच्या क्षेत्रात येणे टाळायला लागले आहेत.कर्मचाऱ्यांवरील आणि अन्य आवश्यक खर्च दरवर्षी वाढत असताना लेखापरीक्षणाचे शुल्क कमी असते. या स्थितीत नफा मिळविण्याचा दबाव फर्म्सवर असताे. त्यामुळे आहेत ते कर्मचारी टिकवून त्यांच्याकडून कामे करून घेण्याचा ताणही फर्म्सवर असताे.‘भारतीय ऑडिट कंपन्यांची फी जगाच्या तुलनेत खूप कमी आहे. अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये बड्या कंपन्यांच्या कामासाठी तासाला 150-200 डाॅलर (सुमारे 12,590 ते 16,787 रुपये) फी घेतली जाते. याच कामासाठी भारतात तासाला 1,700-1,800 रुपये घेतले जातात. भारतातील इनपूट काॅस्ट कमी असली, तरी काम तेवढेच महत्त्वाचे असते,’ असे या क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले.