नवरात्रोत्सवासाठी चतु:शृंगी मंदिर सज्ज : अनगळ

01 Oct 2024 14:01:13
 
 
ch
 
पुणे, 30 सप्टेंबर (आ.प्र) :
 
 वैविध्यपूर्ण धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासह शारदीय नवरात्रोत्सवासाठी श्री चतु:शृंगी मंदिर सज्ज झाले असून, मंदिरामध्ये गुरुवारी (3 ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजता घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात होईल. उत्सवादरम्यान मंदिर भाविकांसाठी खुले राहील. एका भाविकाने तीन लाख रुपये किमतीचे सोने आणि मोत्याची नथ देवीला अर्पण केल्याची माहिती श्री देवी चतुःश्रृंगी मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ आणि अध्यक्ष अमित अनगळ यांनी दिली. मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त देवेंद्र देवदत्त अनगळ यांच्या हस्ते गुरुवारी घटस्थापना होईल; तसेच नवचंडी होम होईल. उत्सवामध्ये सर्व दिवस देवीला अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येईल. दररोज सकाळी 10 आणि रात्री 9 वाजता महाआरती होईल.
 
 
ch 
 
कार्यक्रमांमध्ये यंदा खास आजीचा भोंडला आयोजित करण्यात आला आहे. दसऱ्याला संध्याकाळी सीमोल्लंघनाची मिरवणूक निघेल. त्यामध्ये बँड, कलावंत ढोल-ताशा पथक, नगारा-चौघडा, भुत्ये, वाघ्या-मुरळींसह देवीच्या सेवेकऱ्यांचा सहभाग राहणार असून, हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अनगळ यांनी सांगितले. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, निमलष्करी दल, पोलीस तैनात राहणार आहेत. मंदिर परिसरात 24 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्टने भाविकांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.
 
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे 40 टक्के काम पूर्ण
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, चाळीस टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यासाठी 2 कोटींचा खर्च झाला आहे. शासनाकडून मिळालेल्या दीड कोटी आर्थिक मदतीतून ॲम्फी थिएटर आणि बागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. नवीन सभामंडप पूर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने मोठा झाला आहे. त्यामुळे सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर भाविकांना देवीचे दर्शन होईल, असे श्रीकांत अनगळ यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0