पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयाेजिलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य सचिव मनाेज साैनिक यांच्या हस्ते झाले. नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.पर्यावरण बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डाॅ.अविनाश ढाकणे उपस्थित हाेते. या प्रदर्शनात सहभागी विविध संस्थांनी शाडूपासून बनवलेली मूर्ती, गणेशाेत्सवात देखाव्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू या पर्यावरणपूरक घटक वापरून तयार केल्या आहेत. मुख्य सचिवांनी प्रदर्शनाची पाहणी करून माहिती घेतली आणि या प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.