आत्मतत्त्वाचे अमरत्व सम जावून सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या धर्माचा उपदेश करतात. क्षत्रियाने द्रवीभूत व्हावे हे समयी अनुचित असल्याचे ते सांगतात.अर्जुन कारण नसताना स्वजनांच्या नाशाच्या भीतीमुळे दु:खी हाेत आहे.त्याने स्वधर्माकडे लक्ष दिले तर त्याचे दु:ख दूर हाेईल. दिव्याच्या उजेडाने व्यवहार करणाऱ्या माणसास कसलाही अडथळा येत नाही, त्याप्रमाणे स्वधर्मानुसार वागणाऱ्या माणसास कसलीच अडचण येत नाही. ‘म्हणाेनि यालागीं पाहीं। तुम्हां क्षत्रियां आणिक कांही। संग्रामावांचूनि नाहीं। उचित जाणें।।’ (189).यासाठी अर्जुना, तुम्हां क्षत्रियांना दुसरा धर्मच उचित असा नाही. म्हणून शत्रूवर मारा करू, निष्कपट हाेऊन शत्रूस मारावे. समाेर युद्धाचा प्रसंग आहेच म्हणून हे सांगण्याची तशी जरूरी नाही. उलट भगवान अर्जुनास सांगतात की,‘अरे, हा प्राप्त झालेला युद्धप्रसंग म्हणजे तुझे एक सुदैवच आहे.
क्षात्रधर्म प्रकट करण्याची एक उत्तम संधीच तुला प्राप्त झाली आहे. तुझ्या क्षात्रगुणांवर लुब्ध हाेऊन कीर्ती तुला स्वयंवरात वरण्यासाठी अतिशय आतुर झाली आहे. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा असा युद्धाचा प्रसंग येताे.हे युद्ध म्हणजे अनायासे सापडलेला चिंतामणीच हाेय. जांभई देण्यासाठी ताेंड उघडले असताना त्यात अमृत पडावे त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग आहे. मग खाेट्या अशा स्वजनांबद्दल शाेक कशास करताेस? यात तुझेच अकल्याण आहे.युद्ध न केल्यामुळे कुळाची कीर्ती नाहीशी हाेईल, जग तुला दाेष देईल, स्वधर्माच्या त्यागाचे पाप तुला लागेल, पतिहीन स्त्रीचा जसा पदाेपदी अपमान हाेताे त्याप्रमाणे तुझ्या क्षात्रधर्माची गती हाेईल.’