जगातील सर्वांत माेठे फूल अशी प्रसिद्धी असलेल्या ‘रॅफ्लेशिया’ प्रजातीतील फुले नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत.हवामानातील बदल हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जाते.अगदी टाचणीच्या आकारापासून भल्या माेठ्या आकारापर्यंतची फुले निसर्गात आहेत आणि ‘रॅफ्लेशिया’चा समावेश त्यात हाेताे. जगभरात आतापर्यंत चार लाख प्रकारच्या वनस्पती सापडल्या आहेत.‘रॅफ्लेशिया’ प्रजातीच्या फुलांचा व्यास चार फुटांपेक्षा जास्त आणि वजन दहा किलाेपर्यंत असल्याने ती जगातील सर्वांत माेठी फुलांची प्रजाती आहे. फूल म्हटल्यावर आपल्याला सुगंध जाणवत असला, तरी ‘रॅफ्लेशिया’ त्याला अपवाद आहे. ही फुले सुगंधासाठी नव्हे, तर अत्यंत घाण वासासाठी प्रसिद्ध आहेत. कुजायला लागलेल्या मृतदेहासारखा वास त्यांना असल्याने या फुलांचा उल्लेख ‘प्रेत फूल’ असा करतात.
इंडाेनेशियाच्या सुमात्रा बेटावरील जंगलात आढळणाऱ्या या फुलांचा शाेध डाॅ. जाेसेफ अर्नाेल्ड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 1971 ते 1974च्या माेहिमेत लावला. पथकाचे एक नेते थाॅमस स्टॅमफाेर्ड रेफ्लस यांच्या नावाने या फुलाला ‘रॅफ्लेशिया’ असे नाव दिले गेले. या फुलांच्या 26 प्रजाती आतापर्यंत सापडल्या असून, इंडाेनेशियाबराेबरच मलेशिया आणि फिलिपिन्समध्येसुद्धा या प्रजाती सापडतात.मात्र, हवामानातील बदलांमुळे या प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर असल्याचे ऑ्नसफाेर्ड विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र संशाेधकांनी सांगितले. ‘इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संस्थेनेही लुप्तप्राय हाेत चाललेल्या वनस्पतींच्या यादीत ‘रॅफ्लेशिया’चा समावेश केला आहे.