कात्रज मस्तानी, कात्रज कुल्फी, टेट्रा पॅक दूध लवकरच उपलब्ध होणार

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक भगवान पासलकर यांची माहिती

    27-Sep-2023
Total Views |
 
katraj
 
 
पुणे, 26 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
विक्रीची किंमत न वाढवता शेतकऱ्यांना दुधाचे अधिक दर देतानाच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दुग्धजन्य पदार्थांची संख्या आणि विक्री वाढवत संघ फायद्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दुग्धजन्य पदार्थांची संख्या वाढवताना नव्याने कात्रज मस्तानी तसेच तीन फ्लेवरमधील कात्रज कुल्फीदेखील बाजारात आणली आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालकच तसेच संघाचे व्यवस्थापकीय संचालकही उपस्थित होते. पासलकर यांनी सांगितले, की संघाने वर्षभरात शेतकऱ्यांना गायी आणि म्हशीच्या दुधाला 9 रुपये अधिक दर दिला आहे.
 
मात्र विक्रीचा दर वाढविण्यात आलेला नाही. वर्षभरात दररोजचे दूधसंकलनही 2 लाख लिटरच्या पुढे गेले आहे. संघाने आत्तापर्यंत खाजगी व संघ बल्क कुलर्स मिळून एकूण 147 बल्क कुलर्स बसविले आहेत. बल्क कुलर्सद्वारे संघास चांगल्या गुणप्रतीच्या दुधाचा पुरवठा होत आहे. संघाने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वाढविण्यासाठी पुणे, पिंपरीचिंचवड सह ग्रामीण भागातदेखील मिल्क पार्लर्स सुरू केली आहेत. संघाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीतदेखील वाढ झाली असून, संघाने पेण, पनवेल, नवी मुंबई, वसई तसेच सिन्नर, नाशिक या ठिकाणी मिल्क पार्लर्स सुरू केली आहेत. पुणे-सोलापूर- अक्कलकोट, पुणे-सातारा-महाबळेश्वर आणि अहमदनगर सुपा हे दूधवितरण मार्ग चालू आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी वितरक नेमणूक केलेली आहे.
 
बारामती हा नवीन दूधवितरण मार्ग चालू केला आहे. येरवडा जेल, ससून हॉस्पिटल इ. शासकीय आस्थापनांना दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा सुरू केलेला आहे. 2022-23 मध्ये नव्याने एकूण 134 आधुनिक पद्धतीचे मिल्क व आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यात आलेली आहेत. संघामार्फत एनडीए खडकवासला, एएससी सप्लाय डेपो पुणे कॅम्प, एएससी सप्लाय डेपो खडकी मिलिटरी नगर या मिलिटरी युनिट येथे दूध, टेबल बटर तसेच पाश्चराइज्ड क्रिमचा पुरवठा केला जातो. मागील आर्थिक वर्षात संघाची उलाढाल 350 कोटींच्या आसपास झाली असून, दुग्धजन्य पदार्थांची विक्री सरासरी रु. 80 कोटी झालेली आहे.
 
या आर्थिक वर्षात संघास रु. 51 लाख निव्वळ नफा झाला. कोंढापुरी येथे उभारण्यात आलेल्या पशुखाद्य कारखान्याचे कामकाज पूर्ण झाले असून, पशुखाद्य विक्री सुरू करण्यात आली आहे. पशुखाद्य विक्रीत वाढ होण्यासाठी पशुखाद्य मार्केटिंगवर भर दिला जात आहे. ओतूर दूध शीतकरण येथे जनावरांच्या उपचारांसाठी इथिनो व्हिटरनरी मेडिसीन प्रकल्प उभारणीचा संघाचा मानस आहे. पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या जनावरांसाठी इनपूट सुविधा तसेच पशुखाद्य विक्री वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पशुधन पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. संघाचे अवसरी दूध शीतकरण केंद्र येथे बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. कात्रज मलई कुल्फी, मँगो कुल्फी, ड्रायफ्रुट्‌‍स कुल्फी या तीन फ्लेवर्समध्ये कात्रज कुल्फीचे लाँचिंग करणार आहोत. तसेच लवकरच कात्रज मस्तानी व कात्रज टेट्रा पॅक दूध लाँचिंग करण्यात येत असल्याचे पासलकर यांनी नमूद केले.