अनेकदा एखाद्या संत महात्म्याने देह ठेवल्यानंतर त्याच्या समाधीस्थळीसुद्धा भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवते. त्या केवळ जाणीवेने भक्तांना अद्वितीय समाधानाचा लाभ हाेताे.आजही ज्ञानेश्वर माऊली, संत शिराेमणी तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदास किंवा अगदी अलीकडील संत ब्रह्मचैतन्य गाेंदवलेकर महाराज यांच्या स्थानामध्ये अनेकांना त्या थाेर महात्म्याचे सामर्थ्य जाणवते. आशीर्वाद लाभून शांतीचा लाभ हाेताे.या भक्तांच्या अनुभवास काय आधार मानावा, हा प्रश्न अनेकांना पडताे किंबहुना असे हाेऊ शकते का ,ही शंकाही त्यांच्या मनात येते. श्रीसमर्थ म्हणतात की, असे सत्पुरुष देहात असतानाही त्यांचे चमत्कार भक्त पाहतात. अर्थात त्या संतांना चमत्काराची अजिबात हाैस नसते; परंतु केवळ भक्तांच्या निरतिशय भक्तीला प्रतिसाद देण्यासाठीच ते चमत्कार घडतात.
म्हणजे भक्ताची विशुद्ध भावनाच या प्रचितीचे मूळ असते. संतांनी देह ठेवला तरीही त्यांचे मूळ ब्रह्मस्वरूप कायमच असते. ते देहांत असतानाही देहात नसतातच त्यामुळे देह साेडला तरी संतांच्या स्वस्वरूपात काहीच फरक पडत नाही.त्यामुळे तेव्हाही भक्तांची भावना जर शुद्ध व तीव्र असेल तर संत त्याला दर्शन देतात, कधी कधी उपदेश करतात तर कधी प्रचिती देतात. याचे कारण जसा भक्ताचा भाव असेल तसाच त्याला अनुभव येताे हेच आहे. मनाच्या श्लाेकांमध्ये श्रीसमर्थ सांगतात, असे हाे जया अंतरी भाव जैसा । वसे हाे तया अंतरी देव तैसा ।। यातील अंतरात म्हणजे भक्तांच्या मनात, नित्य राहणारा देव भावाचा भुकेला असताे. पूर्ण भाव पाहून ताे संतुष्ट हाेताे व कृपाप्रसाद देताे.