आसुरी संपत्तीचे विस्तृत वर्णन केल्यावर ज्ञानेश्वर आता या विषयाचा खराेखरीच निराेप घेत आहेत. नरकाची द्वारे असणाऱ्या या असुरांचा संग आपण साेडून द्यावा असा ते उपदेश करतात.काम, क्राेध, लाेभ यांची संगती साेडून एखाद्या पुरुषार्थाची आपण वाटचाल करावी. ज्याचे आपल्या स्वत:वर प्रेम असेल व जाे आत्मनाशाला भीत असेल त्याने या कामक्राेधापासून सावध रहावे.पाेटाशी दगड बांधून हातांच्या जाेरावर समुद्रावर पाेहणे अथवा जगण्यासाठी कालकूट विषाचे भाेजन करणे, तशी या कामक्राेधांची कार्यसिद्धी आहे. अर्जुना, तुझ्या मनात यांच्याविषयी थारा राहू नये. जेव्हा या तीन कड्यांची साखळी तुटेल तेव्हा मनुष्याची वाटचाल आत्मानुभवाच्या मार्गाने हाेईल. कफ, वात, पित्त यांच्या अतिरेकाने शरीर जेव्हा मुक्त हाेईल तेव्हा शरीरास आराेग्य प्राप्त हाेईल. चाेरी, चहाडी, निंदा यांचा नाश झाल्यावर नगरात शांतता लाभते.
आध्यात्मिक, आधिभाैतिक, आधिदैविक असे ताप नाहीसे झाल्यावर अंत:करण आनंदाने भरून येते. त्याप्रमाणे कामादिकांचा त्याग गेल्यावर जगामध्ये सुखच प्राप्त हाेते.माेक्षाच्या वाटेवर संतसज्जनांची संगत मिळते.या संगतीमुळे, शास्त्राच्या श्रवणामुळे जन्ममृत्यूंच्या तावडीतून मनुष्य सुटताे. ज्या गावामध्ये नित्य आत्मानंद राहताे, तेथे गुरुकृपारूपी सुंदर नगर निर्माण हाेते. या गावात आवडत्या वस्तूतील अखेरची वस्तू म्हणजे माऊलीस्वरूपाचा आत्मा भेटताे. त्यानंतर जन्ममृत्यूरूपी धावपळ नाहीशी हाेते. काम, क्राेध, लाेभ यांचा त्याग करून आपला लाभ हाेताे. म्हणून कामादिकांच्या बाबतीत आपले चित्त गुंतवू नये. सर्व जगावर कृपा करणारा, हित दाखविणारा, वेदरूपी बाप त्यासच आपण भजावे. इंद्रियांचे लाड करीत बसू नये.