मी फक्त एका नामातच आहे

07 Aug 2023 15:34:49
 
 

Gondavlekar 
 
मनुष्य कितीही माेठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी ताे जर नामात राहात नसेल, किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर ताे कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नाेकरी केली तर आपला मुलगा नाेकरीच करील असे काही नाही; तसेच जाे भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखे वागावे. काहीतरी वागणे हे संताचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संताचा पहिला गुण हाेय; कारण ‘सर्व ठिकाणी मीच आहे’ ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूच्या अंत:करणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत.
 
अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर ताे अंगावर येत नाही; शिवाय, साधूच्या शुद्ध अंत:करणाचाही त्याच्यावर परिणाम हाेताे. अशा रीतीने संतांच्या अंत:करणाची प्राणिमात्रांनासुद्धा जाणीव असते.अशा संतांचा सहवास मिळणे ही ार भाग्याची गाेष्ट आहे. संतांच्या संगतीत राहून, परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे हेच साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराममहाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना ‘तुझा विसर न पडावा हेच मागतात, तसेच रामदासस्वामी देवाला म्हणतात, ‘तुझ्यायाेगी म्हणजे तुझ्या सहवास, मला नित्य घडू दे.
 
’ ‘याेग असणे’ म्हणजे दुसरे काही नसून, मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त हाेऊन इतर विचारांत भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे; हीच याेगशक्ती. हुकूम कितीही कडक असेना का, परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही; साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे. नाम हे सर्व साधनात सहीसारखे आहे.एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात ताे आपले डाेके आपटून घेई. त्याला मी सांगितले, ‘राेज स्नान झाल्यावर आपल्या पाेटावर गंधाने रामनाम लिहून ठेव, आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्या वेळी त्या नामाकडे पाहा;’ आणि त्या प्रयाेगाने त्या मुलाचा राग आपाेआप शांत झाला. खराेखर नामात किती प्रचंड शक्ती आहे! अनुभव घेऊनच पाहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलाे आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही मी गेलाे नाही, मी जात नाही; मी फक्त एका नामातच आहे.ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्याच्या मागे-पुढे मी आहेच.
Powered By Sangraha 9.0