सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टला प्रसाद वाटपासाठी पुनीत बालन ग्रुपकडून फूड व्हॅन भेट

    28-Aug-2023
Total Views |
 
puneet
 
पुणे, 27 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना दररोज मोफत खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे. या प्रसाद वाहतुकीसाठी ‌‘पुनीत बालन ग्रुप'चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी मठाला ‌‘फूड व्हॅन' उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रसाद वाटपाचे काम आणखी सोईस्करपणे होण्यास मदत होणार आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत प्रसाद वाटपाचा हा उपक्रम सुरू आहे. दररोज साधारणपणे बाराशे ते पंधराशे विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेतात. मात्र, या प्रसाद वाटपासाठी व्हॅनची सोय नसल्याने गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन यांनी तत्काळ प्रसाद वाटपासाठी व्हॅन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर उद्योजिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते या व्हॅनच्या चाव्या ट्रस्टच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर, सचिव सतीश कोकाटे, प्रताप भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने प्रसाद वाटपाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवला जातो. त्यात या व्हॅनच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलून महाराजांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी ट्रस्टचे आभार व्यक्त करतो.
                                                                                                                              -पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)