जगाचे व आपले नाते कसे आहे हे या ठिकाणी भगवंत स्पष्ट करतात.सर्व जीवांची आई म्हणजे कारण मीच आहे आणि मीच बीजरूप पिता आहे. सर्व शरीरात मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचमहाभूते ही सर्व एकच आहेत. देहामध्ये निरनिराळे अवयव नसतात का? तरी देह एकच असताे. त्याप्रमाणे हे विश्व एकच आहे.ईश्वराचा व जगाचा संबंध कसा आहे? मातीचा जसा घडा, कापसाचे जे वस्त्र, लाटांचा जसा समुद्र तसा ईश्वराचा व चराचराचा संबंध आहे. अग्नी व ज्वाला हे दाेन्ही अग्नीच.त्याप्रमाणे ईश्वरच सर्व जग आहे. प्रकट झालेल्या जगाने मी झाकला गेलाे तर जगपणाने काेण प्रकाशताे? माणकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? साेने अलंकार झाले तरी त्याचे साेनेपण जाते का? कमळ उमलले तर कमळत्वाला मुकते का? जाेंधळ्याचा कण पेरून त्यास अंकुर ुटल्यावर त्याचे कणीस तयार हाेते.
म्हणजे पेरलेला दाणा नाहीसा झाला तरी ताे अनेक पटींनी वाढला हे खरे नव्हे काय? हा विचार ज्ञानेश्वरमहाराज एका विशेष पद्धतीने सांगत आहेत. जग दूर सारूनच परमेश्वराला पहावे तसा मी नाही, तर सर्व मिळून मीच आहे. अर्जुना, हा सिद्धांत तू आपल्या अंत:करणात निश्चयाने साठव. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपण पाहताे आणि त्यांचे दु:ख भाेगताे, सूर्य आपल्या तेजाने प्रकाशताे, ढगाने सूर्यास झाकले तरी तेही प्रकाशित हाेतात, त्याप्रमाणे अनेक देहांतून परमात्मा प्रकट झाला तरी त्याचे प्रकाशन ताे स्वत:च असताे. म्हणून अर्जुना, मी काेणत्या गुणाने व कसा बांधलाे गेलाे आहे हे तू नीट समजावून घे. गुण किती आहेत? त्यांचे धर्म काय? इत्यादींचा विचार ज्ञानेश्वरमहाराज पुढे करतात. सत्त्व, रज व तम या तीन गुणांचे माहात्म्य त्यांनी पुढे गाइले आहे.