आपण रामापाशीं मागावें एक । ‘तुझे इच्छेने सर्व जगत् चालतें देख । त्यांतील मी एक पामर । रामा, तुला कसा झालाें जड? ।। रामा, अन्यायाच्या काेटी । तूंच माय घाली पाेटीं ।। मातेलागीं आलें शरण । त्याला नाहीं दिलें मरण । ऐसें ऐकिलें आजवर । कृपा करीं तूं रघुवीर ।। दाता राम हें जाणून चित्तीं । म्हणून आलाें दाराप्रति ।। आता रामा नकाे पाहूं अंत । तुजवीण शून्य वाटे जगत् ।। ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ । तें तें झालें दु:खाला कारण ।। आतां, रामा, सुखदु:ख दाेन्ही । केलें अर्पण तुझे चरणीं ।। आता मनास येई तसें ठेवीं । याविण दुजें न मागणें काहीं ।। आतां, रामा, काेठें जाऊं । तुला टाकून काेठें राहूं? ऐसें काेठें पाहावें स्थान । जेथें हाेईल समाधान? ।। आतां, असाे नसाे भाव । मीं रामा । तुझा झालाें देख ।। आतां कसें तरी करी । मी पडलाें तुझ्या दारीं ।। आतां लाैकिकाची चाड । नाहीं मला त्याची आवड । हें ठसावें चित्तीं । कृपा करीं रघुपती ।।
आता मनास येई तसें करीं । माझें मीपण हिराेनि जाई ।।’ जाेंवर देहाची संगती । ताेंवर मी-माझे ही वृत्ति । राहील अभिमानाला धरून । तेथे न राहे कधी अनुसंधान ।। काळाेख अत्यंत मातला । घालवायला उपाय न दुजा सुचला ।। हाेतां सूर्याचें आगमन । काळाेख जाईल स्वत: आपण ।। प्रपंचांतील संकटें अनिवार । माझ्या बाेलण्याचा करावा विचार । आतां कष्टी न व्हावें ार ।। प्रपंचाची आठवण । हेंच दु:खाचें मूळ कारण ।। तेंच घाेकीत बसल्यानें । न हाेई आनंदरूप स्मरण ।। सुखदु:खाची उत्पत्ती । आपलेपणांत आहे निश्चित ।। स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझे मीच दु:खाला कारण ।। आपण आपलेपणानें वागत गेलें । सुख दु:ख चिंता शाेक यांचे मालक व्हावें लागलें ।।
अमुक व्हावें, अमुक हाेऊं नये । याचें कसें हाेईल, त्याचें हाेईल, त्याचें कसें हाेईल । ही चित्ताची अस्वस्थता । याचें नांव चिंता ।। सुखदु:खें चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था । सुखदु:ख परिस्थितीवर नसतें । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहातें ।। ज्यांत एकाला सुख वाटतें । तेंच दुसऱ्याला दु:खाला कारण हाेतें ।। दु:खाचें मूळ कारण । जगत् सत्य मानलें आपण ।। देहानें कष्ट केले ार । त्यातील फळाचा घेऊन आधार ।। फळ नाहीं हाती आलें । दु:खाला कारण तें झालें ।। आपलें चित्त झालें विषयाधीन । नाहीं दु:खास दुसरें कारण ।। मागील गाेष्टींची आठवण । पुढील गाेष्टींचे चिंतन । हेंच दु:खाला खरें कारण ।। याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ।। प्रपंच न मानावा सुखाचा । ताे असावा कर्तव्याचा । वृत्ति हाेऊं द्यावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ।।