महाभारतातील गीतेवरील भाष्याचा आस्वाद किती आस्थेने व काेमल भावनेने घ्यावा याचे निदर्शन ज्ञानेश्वर महाराज वरील ओवीत करीत आहेत.हे करण्यापूर्वी ज्ञानेश्वर गीतेचाही महिमा गात आहेत.त्यांच्या मते श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवादरूप प्रसंग म्हणजे गीता हाेय. ही गीता म्हणजे प्रभूची वाड्मयी मूर्ती असून भारतरूपी कमळातील सूक्ष्म असा एक सुगंधी कण आहे; किंवा असे म्हणता येईल की, भगवान व्यासांनी सर्व श्रुती व स्मृती यांचे मंथन करून जे शब्दब्रह्माचे नवनीत काढले, ते या गीतेच्या रूपाने प्रकट झाले.
हे नवनीत नंतर ज्ञानाग्नीच्या संसर्गाने कढविल्यामुळे त्याला सुंदर असा सुवास प्राप्त झाला विरक्त पुरुष आपली उदासीनता नाहीशी करण्यासाठी ज्याची इच्छा करतात, भक्त लाेक ज्यांचे नेहमी श्रवण करतात, असा हा भीष्मपर्वातील कृष्णार्जुनसंवादाचा सुसंगत कथाभाग म्हणजे भगवद्गीता हाेय. सनकादिकांसारखे विरक्त पुरुषही या गीतेचे पूज्य भावाने सेवन करतात. ही गीता किंवा तीवरील मराठी भाष्य श्राेत्यांनी किती हळुवारपणे ऐकावे हे ज्ञानेश्वरदृष्टांत देऊन सांगतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पूर्णचंद्राच्या किरणांतील सूक्ष्म अमृतकण चकाेर व त्याची पिले सेवन करतात, त्याप्रमाणे गीतेमधील श्रीकृष्ण व अर्जुन यांचे हे प्रेमाख्यान अत्यंत काेमल चित्ताने श्रवण करावे.
निरूपण करताना वक्त्याच्या मुखातून शब्द निघताच श्राेत्यांचे चित्त अर्थाकार हाेईल इतकी चित्ताची एकाग्रता असावी. किंवा कमळातील सुगंधी कण वेचताना भ्रमर जसा अलगदपणे बसताे, तितक्या सावधपणे व हळुवारपणे गीतेचा आस्वाद श्राेत्यांनी घ्यावा. तरच गीतेचा मथितार्थ श्राेत्यांच्या ध्यानात येईल.कमलिनी पाण्याला न साेडता जसे चंद्राला आलिंगन देते व समाधान पावते, त्याप्रमाणे श्राेत्यांनी गीतेच्या भावार्थाचा आस्वाद घ्यावा.