आतां हे त्याहूनि निपटारें जाहलें। निवटीं आयितें रण पडिलें। घेईं यश रिपु जिंतिले। एकलेनि अर्जुनें ।। 11.470

24 Jul 2023 17:27:14
 
 

Dyaneshwari 
भगवंतांचे विश्वरूपदर्शन सर्व जगाचा ग्रास करणार ही अर्जुनाची भीती देवांनी थाेडी कमी केली, पण अर्जुनच एवढा भांबावला हाेता की, त्याच्या हे ध्यानी आले नाही.जे दुष्ट आहेत, मदाेन्मत्त आहेत, गर्विष्ट आहेत त्यांचाच मी ग्रास करताे हे भगवंतांनी सूचित केले. या म्हणण्यानुसार, कालमुखात जाणारे काैरवांतील याेद्धे आधीच मृतप्राय झाले आहेत. तेव्हा त्यांना मारण्यात अवघडपणा ताे काेणता? असे भगवंत येथे सुचवितात.रंगीत फळे जशी आतून पाेकळ असतात, तसे हे वीर आहेत. असे भगवंतांनी सुचविले. इतके सांगून भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू खुशाल युद्धाला उभा रहा.ज्या सामर्थ्याने शत्रुपक्षातील हे याेद्धे हालचाल करतात, ते मी मागेच नाहीसे केले आहे.
 
आता हे सर्व वीर मातीच्या चित्रासारखे ठिसूळ झाले आहेत. खांबावरल्या बाहुलीची दाेरी तुटली, की तिचे स्थान ढळते व ती खाली पडते, त्याप्रमाणे या सैन्याचा नाश करण्यास तुला वेळ लागणार नाही. म्हणून अर्जुना, शहाणा हाे आणि हातात शस्त्र धारण करून युद्धाला तत्पर हाे. पूर्वी विराट राजाच्या गायी जेव्हा हरण केल्या त्या वेळेस सर्वांनाच तू माेहनास्त्र टाकून त्यांचा पराभव केलास. इतकेच नव्हे, तर विराटाच्या भित्र्या मुलाकडून म्हणजे उत्तराकडून त्यांना पराभूत केलेस.आता तर हे पूर्वीपेक्षा हीनदीन झाले आहेत आणि युद्धाचा आयता प्रसंग निर्माण झाला आहे. तू त्यांना निपटून काढ व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असा लाैकिक मिळव.यामुळे तुला नुसतेच यश मिळेल असे नाही, तर तुला सर्व राज्यही प्राप्त हाेईल. म्हणून तू निमित्तमात्र हाेऊन यांचा नाश कर.
Powered By Sangraha 9.0