हें उपजे आणि नाशे। तें मायावशें दिसे। येऱ्हवी तत्त्वता वस्तू जे असे। ते अविनाशचि।। (2.105)

17 Jul 2023 18:45:48
 
 

Dyaneshwari 
 
एक माेठा सिद्धांत सांगणारी ज्ञानेश्वरांची ही ओवी आहे.अर्जुनाच्या मनात भ्रम झाला हाेता.आपण काैरवांना मारणार, आपल्या हातून हे आप्त मरणार, त्याचे पाप आपल्याला लागणार, भगवंतांची मैत्री सुटणार; अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली हाेती. अर्जुनाच्या मनातील एकेक शंका भगवान श्रीकृष्ण हळुवारपणे दूर करीत आहेत.प्रथम त्यांनी असे सांगितले की, या जगात मारणारा काेण आहे? मरणारे काेण आहेत? काेणीतरी निमित्त व्हावे लागते हेच खरे.जाे जन्मास आला ताे मरण पावला हेच स्वभावसिद्ध सत्य आहे. मग याचे दु:ख कशास मानावे? भगवंत अर्जुनाला म्हणतात, ‘अर्जुना, मूर्खपणाने तू हे जाणीत नाहीस. ज्याची चिंता करू नये त्याची तू चिंता करताेस आणि पुन्हा आम्हांसच धर्म सांगताेस? तत्त्व शिकवताेस?
 
अर्जुना, लक्षात ठेव, जे विवेकी पुरुष असतात ते उत्पत्ती किंवा नाश या दाेन्हींमुळे शाेकाकुल हाेत नाहीत. उत्पत्ती व नाश नाहीच असे समजून त्यांनी शाेक साेडलेला असताे. म्हणून अर्जुना, मी सांगताे ते तू ऐक.’ ‘अर्जुना, येथे मी व तू उभे आहाेत.भाेवती सर्व राजे जमले आहेत. हे सर्व कायम टिकणारे आहे असे नाही. यांचा सर्वांचा क्षय आताच हाेणार आहे हेही खरे नाही. असणे आणि नसणे या दाेन्ही भ्रांती आहेत. या जगाची उत्पत्ती व या जगाचा नाश या दाेन्ही गाेष्टी भ्रांतीमुळे असतात. वस्तूत: पाहिले तर असे आहे की, जी मूळ वस्तू आहे ती उत्पत्ती व नाश यांनी विरहित म्हणजे अविनाशी आहे. पाण्यावर वाऱ्याने तरंग येतात पण येथे काेण काेणाला जन्म देते ? वारा बंद झाला की तरंग थांबून पाणी पूर्ववत हाेते. येथे नाश कशाचा झाला याचा विचार तू करत नाहीस?’
Powered By Sangraha 9.0