पण असे दुश्चित्त श्राेते इतके हीन असतात की, परिश्रमाने त्यांना एखाद्या दुर्गुणातून साेडवावे आणि काही काळाने पाहावे तर ताे दुर्गुण पुन्हा येथून अलगदपणे त्यांना चिकटलेला दिसताे.म्हणून अशाला ते ‘‘ज्याचा अवगुण झडेना । ताे पाषाणाहून उणा ।’’ असे म्हणतात आणि नंतर यावरही कडी म्हणून पाषाणाचे महत्त्व सांगताना म्हणतात की, माणिक, पाचू, वगैरे नवरत्ने, सूर्यकांत, चंद्रकांत वगैरे बहुगुणी मणी हे पाषाणाचेच आहेत आणि अगदी साधे दगड घेतले तरी ते तळी, विहिरी बांधायला आणि भगवंताच्या सुबक मूर्ती घडवायला उपयाेगी पडतात.त्यामुळे असा दुश्चित्त माणूस पाषाणाच्याही पासंगाला पुरणार नाही इतका हीन समजला पाहिजे.
अस्थिर, सैरभैर व अश्रद्ध चित्तामुळे येणाऱ्या दुश्चित्तपणामुळे श्रवण, भजन, चिंतन, मनन हाेत नाही. ज्ञानार्जन हाेत नाही. काळजी, वासना व अविवेक प्रबळ हाेऊन कार्याचा नाश हाेताे. दुश्चित्त माणूस देहाने एका जागी दिसला तरी त्याचे मन चंचलपणाच्याचक्रव्यूहात अडकून लाखाे ठिकाणी व्यग्र असते. त्यामुळे एखाद्या वेड्यापिशा माणसासारखे दुश्चित्त इसमाचे आयुष्य व्यर्थ जाते. त्याचा प्रपंचसुद्धा जेथे व्यवस्थित हाेत नाही त्या अभाग्याला परमार्थ काेठून साध्य हाेणार? ‘दुश्चित्त निरूपण’ या आठव्या दशकातील सहाव्या समासाच्या प्रारंभालाच ही दुश्चित्ताची लक्षणे व हीन अवस्था सांगून श्रीसमर्थ श्राेत्यांना ही अस्वस्थता, चंचलता साेडून चित्त सावधपणे एकाग्र करण्याचे आवाहन करीत आहेत.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299