तुम्हाला काेण नकाे म्हणताे? अशांतीची कारणे आहेत. पण आपण अशी माणसं आहाेत की एकीकडून आपण शांत हाेण्याची व्यवस्था करीत असताे तर दुसरीकडून अशांतीच्या बीजांना खतपाणी घालीत असताे.हेच पहा ना एक माणूस म्हणताे ‘मला शांत व्हायचंय’. पण प्रत्यक्षात अहंकाराचं भरण-पाेषण करीत राहताे. आता ताे शांत हाेईलच कसा? एकीकडे म्हणताे मला शांत व्हायचंय अन् दुसरीकडं परिग्रहासाठी वेडा झालेला असताे.आणखी एक वस्तू घरात असली तर घरात स्वर्ग उतरेल, असं त्याला वाटत असतं. एकीकडून त्याला शांत व्हायचं असं ताे म्हणताे. ताे बहुदा याचसाठी शांत हाेऊ इच्छिताे की जे फर्निचर आता ताे मिळवू शकत नाहीये ते ताे शांत हाेऊन मिळवू इच्छित असावा.
जे दुकान आता नीट चालत नाही, ते शांत झाल्यावर नीट चालू लागावं. ताे शांत हाेऊ इच्छिताेय तेही बहुधा जणू याचसाठी की ताे जी अशांतीची व्यवस्था करताे आहे तीमध्ये आणखी काैशल्य यावं, आणखी व्यवस्था यावी. आपण स्वत: अशांतीची कारणं वाढवीत असताे.नुकताच एक तरुण माझ्याकडे आला.म्हणाला, मी मेडिकलचा विद्यार्थी.परीक्षा पास झालाेय, पण मन फारच अशांत आहे. माझं मन शांत हाेईल असा काही मार्ग सांगा.मी म्हटले - शांत कशासाठी हाेऊ इच्छिता? शांत हाेऊन कराल काय? ताे म्हणाला - हे काय विचारणं झालं? कशासाठी म्हणून काय विचारता? मला परीक्षेत गाेल्ड मेडल मिळवायचं आहे.