जेणे हाेय समाधान । ते तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसी ।।1।।

09 Jun 2023 15:03:09
 
 
 

saint 
शुद्ध विद्या अभ्यासाच्या मागे येत असते हे मागील समासात सांगितल्यानंतर या अभ्यासाचा मुख्य मार्ग म्हणजे श्रवणभक्ती हाेय. हे श्रीसमर्थ या आठव्या ‘श्रवणनिरूपण’ समासात विशद करीत आहे. विषयांची आसक्ती कमी हाेणे, विरक्तीकडे ओढा लागून भगवंताची भक्ती उत्पन्न हाेणे, अभिमान संपून चित्तशुद्धी हाेणे आणि ती शुद्ध बुद्धी स्थिर हाेणे हाच ज्ञानाचा आणि परमार्थ साधण्याचा मार्ग आहे. हे सर्व उपदेश व सद्विचारांचे श्रवण केल्याने म्हणजेच ते सतत ऐकल्याने साध्य हाेते. म्हणून श्रवणाने समाधान प्राप्त करून घेणे हाच परमार्थाचा राजमार्ग आहे हे तू निश्चयाने जाणून घे, असे सांगून श्रीसमर्थ या समासाचा प्रारंभ करतात.आपल्या राेजच्या व्यवहारातही ऐकल्याशिवाय काेणतेही ज्ञान मिळत नाही, हा आपला अनुभव परमार्थातही लागू आहे.
 
त्यामुळे प्रपंच काय आणि परमार्थ काय, प्रवृत्ती काय आणि निवृत्ती मार्ग काय, श्रवणावाचून पर्याय नसताे. म्हणून काेणत्याही ज्ञानार्जनाच्या प्रयत्नाआधी श्रवण गरजेचे आहे. ज्ञान मिळविताना श्रवण पाहिजेच आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावरही ते ज्ञान जागृत व स्थिर राहण्यासाठी श्रवण चालू ठेवावेच लागते, असा श्रवणाचा अगाध महिमा आहे.केवळ ऐकणे एवढाच श्रवणाचा मर्यादित अर्थ येथे अभिप्रेत नाही, तर ऐकल्यानंतर विचार करणे आणि ते विचार अंगात बाणून त्याप्रमाणे आचरण करणे असा त्याचा व्यापक अर्थ आहे. श्रवण, मनन, चिंतन आणि आचरण ही त्याची एकत्रित चतु:सूत्री समजून घेतली पाहिजे.
Powered By Sangraha 9.0