दशकातील या दुसऱ्या आणि पुढे तिसऱ्या सूक्ष्म आशंकानिरूपण समासांमध्ये ब्रह्म जर निराकार आहे, तर तेथे हे चराचर विश्व कसे निर्माण झाले या श्राेत्यांच्या मनातील प्रश्नाला उत्तर दिले आहे. हा प्रश्न खराेखरीच अनेकांना पडलेला असताे. ब्रह्म निर्गुण आहे मग त्यातून ही सगुण साकार जीवसृष्टी कशी निर्माण झाली? हे दिसणारे विश्व खाेटे आहे असे म्हणावयाचे आणि जाे दिसत नाही ताे परमात्मा खरा आणि अविनाशी मानावयाचा हे कसे? परमात्म्याची जर काेणतीही इच्छा नसते तर हे विश्व निर्माण करण्याची तरी इच्छा त्याला कशी हाेईल?
हे जे जे घडले आहे, घडत आहे किंवा पुढे घडणार आहे ते परमेश्वराच्या इच्छेनेच घडत आहे असे बहुतेक ग्रंथातूनसांगितले आहे; पण ही एक केवळ वाचकांची समजूत घालावयाची युक्तीच नव्हे का? परमात्मा जर या सगुणाचा कर्ता म्हटला तर मग त्याचे निर्गुणत्व खाेटे पडणार नाही का? असे एकातून एक अनेक प्रश्न निर्माण हाेतात. श्रीसम र्थांचे वैशिष्ट्य हेच की, श्राेत्यांच्या मनात येतील त्या आणि श्राेत्यांच्या मनात सहजी येऊ शकणार नाहीत त्यासुद्धा शंका विचारात घेऊन त्या सर्व शंकांचे ते साधार निरसन करतात. काेणाला वाटते की तूप शिजून घट्ट झाले काय किंवा वितळले काय, तूप तूपच असते. तसेच ही माया नाहीच आहे. ते सगळे परब्रह्मच आहे. चाेख साेने आणि साेन्याचा दागिना यात जसे भिन्नपण नाही, तसेच ब्रह्म आणि माया हेही अभिन्न व एकरूपच आहे.