कारण या संभ्रमाचे मूळ देहबुद्धीत आहे; पण जेथे देहबुद्धी सुटली तेथे हा संशय संपून गेल्याने मुक्त का बद्ध हा विचारही उरत नाही.
मी मुक्त झालाे आहे अशी जाणीव ज्याला राहते त्याला मुक्त कसे म्हणणार? ताे बद्धच समजला पाहिजे. कारण स्वस्वरूपात विलीन हाेऊन मुक्तावस्था आली की तेथे खुद्द मुक्तपणही संपून गेलेले असते. ही जाणीव शिल्लक ठेवणे म्हणजे पाेटाला दगड बांधून पाेहावयाचा प्रयत्न करण्याइतके मूर्खपणाचे आहे.बद्ध व मुक्त हे दाेन्ही शब्द कल्पनेच्या आधाराने नांदतात. ही कल्पनाच संपविणे म्हणजे मुक्ती आहे असे सांगून श्रीसमर्थ या समासाचे सार सांगताना म्हणतात, की ज्याचा ‘मी’पणा संपला आहे ताे मुक्त हाेताे.
ताे प्रपंचात राहिला, सर्वांशी बाेलला किंवा अगदी माैन धारण करून बसला तरी त्याच्या मुक्तावस्थेत फरक पडत नाही.आपली देहाची व विकारांची गुलाम बनलेली बुद्धी कल्पनेनेच मुक्त आणि बद्ध हे भेद मांडण्याचा प्रयत्न करीत असते. परंतु ही कल्पना व तिच्यामुळे निर्माण हाेणारे संशय नष्ट झालेला साधू देहातीत झालेला असताे व सर्वार्थाने मुक्त हाेऊन परमात्म-स्वरूपात एकरूप झालेला असताे.ही मुक्ताची खरी खूण जाणून साधकांनी त्या मार्गाने जावे अशीच श्रीसमर्थांची इच्छा आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299