स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा काेणीकडे ।।1।।

29 Jun 2023 13:41:00
 

saint 
 
निंदेप्रमाणे स्तुती करण्याचा प्रकारही कांही कमी नसताे. स्तुती ही दाेन प्रकारे केली जाते. एक मनाभावातून व दुसरी समाेरच्याला बरे वाटावे म्हणून स्तुती केली जाते. सत्य असेल किंवा स्तुतीस पात्र असेल तर स्तुती करू असे म्हणावे लागत नाही. हे सत्य असले तरी ज्याची स्तुती केली जाते, त्याच्यावर कांही प्रमाणात का हाेईना प्रेम असावे लागते. बऱ्याचवेळा लाेक आपला स्वार्थ साधला जावा म्हणून समाेरच्याला बरे वाटण्यासाठी स्तुती करतात. पण कांही लाेक असे असतात की त्यांची मनाभावातून प्रेमापाेटी, सत्यापाेटी जरी भरपूर स्तुती केली तरी ती कमी पडते.आपणाला सद्बुध्दी देणारा, आपल्याकडून समत्व, बंधुत्व, निस्वार्थ प्रेम आदिची जाेपासणूक करून घेणारा आणि कर्तव्यतत्पर ठेवणारा भगवंत स्तुतीस अत्यंत पात्र आहे.
 
या भगवंताची स्तुती करण्यात वेदही कमी पडले आहेत. तेथे माझ्याकडून हाेणारी स्तुती परीपूर्ण हाेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथे माझा धंदा काेणीकडे ।। जन्मदात्रीची आपण कितीही स्तुती केली तरी ती कमी असते. आईने आपल्यासाठी काय काय केले असेल व किती अंत:र्भावातून केले असेल ते काेणालाही शब्दात सांगता येणे कठीण असते.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0