तेथ महेशान्वयसंभूतें। श्रीनिवृत्तिनाथसुतें। केलें ज्ञानदेवें गीते। देशीकार लेणें।। (18.1805)

28 Jun 2023 11:46:47
 
 
 

Dyaneshwari 
‘एक तरी ओवी अनुभवावी।’ या मालिकेतील ज्ञानेश्वरी मधील ही शेवटची ओवी आहे. विश्वरूप देवाला पसायदान मागितल्यावर ज्ञानेश्वर तृप्त झाले. ग्रंथ ज्यांचे जीवन आहे त्यांना सर्व विजय मिळावा अशी ज्ञानेश्वरांची विनंती ऐकून निवृत्तिनाथांनी ही विनंती मान्य केली आणि हा दानप्रसाद मिळाल्यावर ज्ञानदेव अंत:करणाने सुखी झाले. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ग्रंथाच्या निर्मितीचे स्थळ व निर्मितीचा काळ यांचे उल्लेख ज्ञानेश्वर करीत आहेत.ज्ञानेश्वर म्हणतात की, या कलियुगात आणि महाराष्ट्रदेशात गाेदावरीच्या दक्षिणतीरावर एक पवित्र क्षेत्र आहे. त्रैलाेक्यामध्ये पावन असणाऱ्या या क्षेत्रात सर्व जीवांचे चालक श्रीमाेहिनीराज यांचे स्थान आहे. येथील खांबाला टेकून संत श्राेत्यांपुढे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाचे निरूपण केले.
 
ज्ञानेश्वरीच्या सर्व म्हणजे नऊ हजार ओव्यांत फक्त एका ओवीत ज्ञानेश्वरांनी राजाचा उल्लेख केला आहे. त्या काळी यादववंशातील श्रेष्ठ राजा रामदेवराय न्यायाने राज्य करीत हाेता. त्याच्या ठिकाणी सर्व कलांचे निवासस्थान हाेते. हा एकच उल्लेख राजासंबंधाने असून ताे अर्वाचीन लाेकांना सूचक व मार्गदर्शक आहे.ज्ञानेश्वर म्हणतात की, अशा या पवित्र ठिकाणी म्हणजे नेवासे येथे आदिनाथ शंकरांच्या परंपरेत निर्माण झालेल्या निवृत्तिनाथांच्या शिष्याने म्हणजे ज्ञानदेवाने गीतेवर मराठी भाषेचा अलंकार चढविला. हा कृष्णार्जुनसंवाद परमहंसरूपी राजहंसांनी सेवन करण्यासारखा आहे. सर्वांचे स्तवन झाल्यावर ज्ञानेश्वर आणखी एका व्यक्तीचा उल्लेख शेवटी करतात. शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण झाले आणि सच्चिदानंदबाबा याने हा ग्रंथ पूज्य बुद्धीने लिहून घेतला असे ते सांगतात.
Powered By Sangraha 9.0