वांचूनि पढे ना वाची। ना सेवाही जाणे स्वामीची। ऐशिया मज ग्रंथाची। याेग्यता कें असे।। (18.1764)

22 Jun 2023 16:22:14
 
 

Dyaneshwari 
 
गुरूकृपेचे माहात्म्य सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर अतिनम्रपणे आपल्या उणिवेचा उल्लेख करतात.गुरूकृपेने प्राप्त झालेले वैभव आपण ग्रंथरूपाने प्रकट केले हे खरे. पण आपली याेग्यता ती काेणती? ज्ञानेश्वर म्हणतात की, मी जरी काही शिकलाे नाही, माझे वाचन झालेले नाही, आणि गुरूची सेवाही माझ्या हातून घडली नाही, तरी माझा सद्गुरूनाथ एवढा माेठा की, त्यांनी मला निमित्त करून ग्रंथरचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले. शब्द कसा बनवावा, चढत्या गतीने व्याख्यान कसे रंगवावे, अलंकार म्हणजे काय इत्यादि मी जाणत नाही. पण कळसूत्री बाहुली जशी नाचते, तसे गुरूकृपेच्या सूत्रामुळे मी बाेलताे. संबंध ज्ञानेश्वरी पाहता ज्ञानेश्वरांची प्रगाढ विद्वत्ता ध्यानात येते.बालवयातच सर्वज्ञतेने त्यांना वरले हाेते.
 
काव्यशास्त्र, अलंकारशास्त्र, साहित्यविचार यांचे त्यांना उपजतच अंग हाेते. तत्त्वज्ञान व परमार्थविचार त्यांना गुरूपरंपरेने प्राप्त झाला हाेता. व्यासांना व भाष्यकारांना त्यांनी वाट पुसली हाेती. समाजाचे त्यांचे निरीक्षण किती सूक्ष्म व विविध प्रकारचे हाेते हे त्यांच्या दृष्टांतसृष्टीवरून ध्यानात येते. याेगाची तर त्यांना थाेर अनुभूती हाेती, हे सहाव्या अध्यायावरून ध्यानात येते. कुंडलिनीयाेग हा ज्ञानेश्वरांनींच एवढ्या विस्ताराने सांगितले आहे. इतके असूनही ज्ञानेश्वर किती नम्र आहेत ते पहा. आपण काही जाणीत नाही, आपण गुरूची सेवा केली नाही, आपणांस काव्यशास्त्र माहीत नाही, व्युत्पत्ती माहीत नाही, केवळ गुरूकृपेच्या बळावर आपण हा ग्रंथ निर्माण केला असे ज्ञानेश्वर विनम्र भावाने म्हणत आहेत. ‘जाणाेनि नेणते करीं मज।‘ ही ज्ञानेश्वरांची उक्ती खरीच नव्हे काय ?
 
Powered By Sangraha 9.0