सद्गुरूकृपेमुळे आपण काय करू शकताे हे ज्ञानेश्वर या ओवीत सांगत आहेत. गुरूच्या कृपेमुळेच गीतेचा अर्थ लाेकांना डाेळ्यांनी दिसेल इतका स्पष्ट करून मी सांगितला. संस्कृत गीतेसह मराठी टीका मी निरूपण केली. गीता न सांगता हे मराठी भाष्य काेणी वाचले तरी त्याला आनंद हाेईल. असा हा ओवीबद्ध ग्रंथ मी जाणत्या मनुष्यापासून साध्या मुलापर्यंत सहज काेणालाही समजेल अशा ओवीवृत्तात ब्रम्हरसाने रुचकर झालेल्या अक्षंरात गुफंला.ज्ञानेश्वरीचे वाचन व श्रवण हे काेणासाठी आहे याचा निर्देश ज्ञानेश्वर येथे करीत आहेत. आपला ग्रंथ जसा विद्वानांसाठी आहे, तसा ताे बालबुद्धीच्या वाचकांसाठी व श्राेत्यांसाठी आहे. आजचे वारकरी संप्रदायाचे स्वरूप पाहता ज्ञानेश्वरांचे हे बाेलणे सत्य वाटते. एखाद्या वेळेस विद्वानाला ज्ञानेश्वरी समजणार नाही, पण निरक्षर मनुष्य ज्ञानेश्वरीवर उत्कृष्ट निरूपण करू शकताे याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.
आबालवृद्धांना व स्त्रीशूद्रांना या ग्रंथाने परमार्थाची वाट माेकळी करून दिली. पूर्वीची बंदिस्त चाैकट ढिली केली. पुढे एकनाथांच्या काळात तर परमार्थातील ही समता सामाजिक क्षेत्रातही उतरलेली दिसते.ज्ञानेश्वरांच्या पूर्वी पारमार्थिक वा आध्यात्मिक ज्ञान संस्कृत भाषेमध्ये काेंडून राहिले हाेते. पण सर्वसामान्य माणसाचा कानाेसा घेऊन, त्याची भूक लक्षात घेऊन ज्ञानेश्वरांनी संस्कृत गीता सद्गुरूंच्या कृपेने मराठीत आणली व सर्वत्र ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण केली. ज्ञानेश्वरांच्या काळातील नामदेव, जनाबाई, गाेरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, नरहरी साेनार, चाेखा महार इत्यादि संत याची साक्ष देतील.