सर्वव्यापी ज्ञान देणाऱ्या वेदांनाही ईश्वराचे अस्तित्व कळले नसले, तरी संसारात अडकलेल्या जीवाला त्याचे अस्तित्व कळू शकते, असे संतांनी म्हटले आहे. संसारात अडकलेला जीव जेव्हा ईर्षा, द्वेष, अभिमान, अहंकार, काम, क्राेध, स्वार्थ, मीपणा या स्वनिर्मित शत्रूंवर विजय मिळवताे तेव्हा ताे आपाेआप समता, बंधुता, निस्वार्थ कर्तव्याच्या मार्गावर चालू लागताे. हा मार्ग त्याला आपाेआप ईश्वरापर्यंत नेऊन पाेहचवताे. खरे म्हणजे समता, बंधुता, नि:स्वार्थ प्रेम, कर्तव्य हीच ईश्वराची खरी रुपे असल्याने या रुपाचा वर्तनातून अनुभव येणाऱ्यास ईश्वराचे वेगळे असे अस्तित्व शाेधण्याची गरज पडत नाही.
वर्तनशून्य असणाऱ्याने कितीही पूजापाठ केले तरी ते व्यर्थच असणार आहेत. ईश्वरापर्यंत नेऊन पाेहचवणाऱ्या मार्गावरून चालण्यासाठी किंवा ईश्वरस्वरुप हाेण्यासाठी घरदार साेडावे लागत नाही. तर खऱ्या अर्थाने आपल्या घरातूनच समता, बंधुता, नि:स्वार्थ प्रेम, कर्तव्याच्या मार्गावर चालावे लागते. जाे घरात या मार्गावरून चालत नाही ताे समाजात या मार्गाचा अवलंब करून शकत नाही. ज्ञानाेबा-तुकाेबांच्या शिष्यांना या मार्गावरून चाला असे सांगण्याची स्वतंत्र गरज पडेल असे वाटत नाही.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448