सर्व कर्मांचा त्याग करणे हे देहधारी माणसास शक्य हाेत नाही.म्हणून कर्मफलांचा त्याग करणे यालाच गीतेने त्यागी म्हटले आहे.
मातीचा कंटाळा करून मडके काय करील? वस्त्र तंतूचा त्याग करील का? अग्नी उष्णतेला कंटाळेल का? दिवा प्रकाशाचा द्वेष करील का? हिंग आपला वारसा कसा साेडील? पाणी ओलेपणा साेडील काय? त्याप्रमाणे विहित कर्माचा त्याग देहधारी करणेच शक्य नाही. कपाळाला गंध लावले असले तरी ते पुसता येते, पण कपाळ मूळचेच वाकडे असले तर गंधही तसेच हाेणार. या प्रमाणे शरीराच्या रूपाने कर्मे हाेत असल्याकारणाने त्यांचा त्याग करता येणार नाही.श्वासाेच्छ्वासादिक स्वाभाविक कर्मे निजल्यावरदेखील हाेतात. शरीराच्या रूपाने कर्मच मागे लागले आहे. म्हणून विहित कर्माला त्यागणे बराेबर नाही. या कर्मांची फळे मनात न धरता ती केल्यास न केल्यासारखीच हाेतात.
कर्मांच्या फळाची इच्छा धरू नये. ते ईश्वराला अर्पण करावे. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त हाेईल. आणि कर्मांचा आपाेआपच त्याग हाेईल. नाहीतर त्याग म्हणजे मूर्च्छित झालेला राेगी विसावा घेत आहे असे म्हणण्यासारखे हाेईल. अशा रीतीने कर्मफलाचा त्याग म्हणजेच नैष्कर्म्य हाेय. जे पुरुष कर्मफलाची आशा साेडत नाहीत त्यांना तीन प्रकारची कर्मे प्राप्त हाेतात. नरकादि अनिष्ट, स्वर्गादि इष्ट आणि मनुष्यलाेकातील मिश्र अशी फले प्राप्त हाेतात. मुलीला जन्म देणारा पिता ही आपल्या मालकीची नाही असे मानीत असताे. आणि कन्यादानाच्या वेळी तिला पिता जामाताच्या स्वाधीन करताे. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य कर्मात लिप्त हाेत नाही. कर्तृत्वाचा अहंकार व फलाशा ह्यांनी त्याचे कर्म बद्ध हाेत नाही. जाे फलाशा ठेवीत नाही, ताे जगाच्या भानगडीतही पडत नाही.