मनुष्य मला भेटला की ताे सुखी किती आहे हे मी पाहताे, त्याच्या इतर गाेष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यावरून ताे सुखी आहे की नाही हे ठरवता.भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी हाेईल? लाेकांना श्रीमंत आवडताे तर मला गरीब आवडताे.लाेकांना विद्वान् आवडताे, तर मला अडाणी आवडताे.असे माझे सगळे जगाच्या उलट आहे; पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शाेध लावला. प्रपंचात परमार्थ कसा आणावा, परमार्थ व्यवहारात कसा वापरावा, याचे शास्त्र मला चांगले माहीत आहे.मी समाधानरूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे.
जाे माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट हाेतात. आजपर्यंत मी एकच साधन केले : कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी रहा की झाले! माझ्याजवळ काय आहे ते सांगा! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही.पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करताे, त्यामुळे लाेकांना मी हवासा वाटताे आणि त्यांना माझा आधार वाटताे. जगाचास्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला काेण काय म्हणताे हे मी पाहिले नाही, मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. माझे सांगणे ऐकल्यानंतर पुन: तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणे असू शकतील. एक, मला चांगले सांगता आले नसेल; दुसरे, तुम्हांला ते समजले नसेल; किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल.
तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बाेलावे; आपण आपल्या घरांतल्या माणसांशी जसे बाेलताे तसे अगदी आपलेपणानेमाझ्याशी बाेलावे. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बाेलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असताे.मी एखाद्याला सांगत असताना ‘माझे जाे ऐकेल त्याचे खास कल्याण हाेईल’ याची मला खात्री असते, पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे हाेय. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही; पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही; अशी केली नाही तर ताे रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थाेडी कमी हाेईल, पण ताे जगेल हे मात्र निश्चित हाेय; आणि जगल्यावर ताे आज ना उद्या नाम घेईल. राेगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयाेग आहे? मी एकदा बीज पेरून ठेवताे, आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही.