ज्ञानेश्वरीचा उपसंहार करताना ज्ञानेश्वर गीतारूपी प्रासादाचे विस्ताराने वर्णन करीत आहेत.गीतेचे सातशे श्लाेक सर्वच महत्त्वाचे आहेत. सूर्याला धाकटा व माेठा असे कसे म्हणता येईल? पारिजातकाच्या ुलांत जुनी व नवी असा भेद असत नाही. या गीताशास्त्रात श्रीकृष्णच वाच्य व वाचक आहेत.गीतेच्या अर्थाच्या ज्ञानापासून जे फळ मिळते तेच तिच्या पाठानेही मिळते. म्हणून आता गीतेचे आणखी समर्थन करण्यासाठी काही उरले नाही. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, ‘गीता जाण हे वाययी। श्रीमूर्ति प्रभूची।’ (18.1684) गीता ही प्रभूची शब्दमय अशी सुंदर मूर्ती आहे. इतर शास्त्र आपल्या विषयाचे ज्ञान देऊन स्वत: नाहीसे हाेते. पण गीताशास्त्र हे स्वत:च परब्रम्हरूप आहे.देवांनी विश्वाची करुणा येऊन ब्रह्मानंद अतिशय साेप्यापद्धतीने अर्जुनाच्या निमित्ताने प्रकट केला.
चकाेराच्या निमित्ताने चंद्रकिरणांनी तापलेले तीनही लाेक शांत केले. काेकिळाने आपल्या मधुर कंठाने सर्व जगाचा ताप दूर केला. शिवशंकरांनी गंगेचा ओघ मुक्त केला. त्याप्रमाणे श्रीकृष्णरूपी गायीने अर्जुनाला वासरू करून जगाला पुरेल एवढे दुभते निर्माण केले आहे. या गीतारूपी गंगेत जाे स्नान करील ताे गीतारूप हाेऊन जाईल.पाठाच्या निमित्ताने नुसती जीभ ओली केली तरी चालेल.
परिसाच्या स्पर्शाने लाेखंडाचे जसे आपाेआप साेने हाेते, त्याप्रमाणे गीतेचे श्लाेक मुखात येताच ब्रम्हतेजाची पुष्टी अंगास आपाेआप येते. गीता ऐकण्याने, पठण केल्याने माेक्षासारखा दुर्मिळ पदार्थ प्राप्त हाेताे. म्हणून गीतेचे स्तवन करावे. इतर शास्त्रे घेऊन काय करावयाचे आहे? व्यासांनी ही गीता तळहातावर घेता येईल इतकी साेपी केली आहे.आई मुलाला झेपेल येवढा त्रास करते, त्याप्रमाणे व्यासांनी सर्वांना समजेल अशा पद्धतीने गीताशास्त्र प्रकट केले.