देखिले तें सत्यचि मानावें । हे ज्ञात्याचे देखणे नव्हें ।।2।।

09 May 2023 14:29:24
 
 
 
saint
 
पुराणकाळी राक्षस मायावी विद्येने हवे ते रूप घेत असत. मारीचाने सुवर्णमृगाचे रूप घेऊन सीतामाईंना फसविले हाेते. राक्षसांची ही इंद्रजाल विद्या आणि कुशल माणसाची हुबेहूब प्रतिकृतीची विद्या ज्याला येथे श्रीसमर्थ ‘बाजीगरी’ म्हणतात.या दाेन्हींमुळे असत्याला सत्याचा मुलामा प्राप्त हाेताे. अगदी याप्रमाणेच भगवंताची माया असलेली ही सृष्टी खऱ्याप्रमाणे भासते, पण सत्य ज्ञान झाल्यावर तिच्या खाेटेपणाचे ज्ञान हाेते. आपली देहबुद्धी शाबूत असल्यामुळेच ही मिथ्या सृष्टी खरी वाटू लागते आणि तिचेच आकर्षण वाढू लागते व त्यामुळे परमार्थाचा मार्ग कुंठित हाेऊन जाताे.आपला मानवी देह हा हाडामांसाचा बनलेला आहे आणि आपला डाेळा म्हणजे केवळ मांसाचा आणि स्नायूंचा आहे.
 
आता या डाेळ्यांनी मी ब्रह्मरूप पाहीन असे म्हणणारा ज्ञानी नसून आंधळाच आणि केवळ मूर्ख समजला पाहिजे. ज्ञान प्राप्त करून ज्ञानचक्षूंनीच ब्रह्मरूप पाहता येते त्याला या चर्मचक्षूंचा काहीच उपयाेग नाही. श्रीसमर्थ असे सांगून दिसणाऱ्या सृष्टीच्या खरेपणाची शंका निरसन करून परब्रह्माचे मूळ लक्षण सांगतात.ते म्हणतात दृष्टीला दिसणारे आणि मनाला भासणारे जे जे आहे ते ते कालांतराने नाश पावते, हे जाणणे आवश्यक आहे. जे नाश पावते ते परब्रह्म असूच शकत नाही. म्हणून जे दिसत नाही, भासत नाही असे त्याहीपलीकडचे दृश्यातीत असते. असे परब्रह्म केवळ सत्य ज्ञानाची प्राप्ती करूनच ज्ञानचक्षूंनी जाणता येते, हे साधकांनी ध्यानात ठेवावे आणि दृश्य सृष्टीतील ममत्व पूर्णपणे साेडून द्यावे आणि परब्रह्मापाशी आपले मन अनन्य करावे! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0