आपणासारख्या सर्वसामान्य प्रपंची लाेकांना नेहमी जाे प्रश्न पडताे ताेच श्राेत्यांच्या द्वारे विचारून या सहाव्या ‘‘बद्धमुक्तनिरूपण’’ समासाचा प्रारंभ हाेताे. एखाद्या सत्पुरुषाचे विचार ऐकले, नामस्मरण केले की आपले मन परमार्थाकडे ओढ घेऊ लागते. पण, प्रपंच पाठीमागे लागलेलाच असताे ताे सुटत नाही.त्यामुळे पुन्हा राेजच्या व्यवहारात गुंतावे लागते. म्हणजे एकीकडे मुक्तावस्थेची सुप्त इच्छा हाेते, तर त्याचवेळी दैनंदिन प्रपंच सुटत नाही; अशी आपली द्विधा मन:स्थिती हाेत असते. ही द्विधा वृत्ती सांगताना येथे श्राेता म्हणताे की, ‘‘स्वामी, तुमचे अद्वैत निरूपण ऐकून मी ब्रह्माशी तदाकार झालाे आणि त्या सच्चिदानंदातच राहावे; पुन्हा संसारात येऊच नये असे वाटू लागले; परंतु प्रपंचात असल्यामुळे पुन्हा ऐहिक गाेष्टीकडे यावेच लागले.
असे माझे येणे जाणे काही केल्या चुकत नाही. एखाद्या कीटकाला उडण्याची शक्ती असावी. पण, त्याचे पाय दाेऱ्याने बांधलेले असावेत अशी माझी अवस्था हाेते.’’. ‘‘धाेबी का कुत्ता, ना घरका ना घाटका’’ याप्रमाणेच ही दाेलायमान अस्थिर अवस्था असते. अशा वेळी सद्गुरूंचा उपदेश ऐकतानाच मृत्यू यावा म्हणजे मुक्ती मिळेल किंवा देहबुद्धी पूर्णपणे नष्ट हाेऊन तुझे माझे हा आपपर भाव संपावा म्हणजे त्या ब्रह्मानंदात सदैव राहता येईल, पण असे हाेत नाही.निरूपण चालू असताना शुद्ध ज्ञान जागृत हाेते; पण जसा सूर्य मावळल्यावर प्रकाश संपावा तसे निरूपण संपले की ज्ञान मावळते आणि मग पुन्हा कामक्राेधासारखे विकार मनाला झाेंबाळून तेथील ब्रह्मरूप निष्प्रभ करून टाकतात.