सहाव्या समासात सांगितलेले सृष्टीचे खाेटेपण श्राेत्यांना पटल्यावर त्यांच्या मनात सहजच असे असेल, तर मग दृश्य अशी सगुण भक्ती तरी का करायची असा प्रश्न येईल, हे जाणून श्रीसमर्थ या सातव्या ‘सगुणभजन’ समासात त्या प्रश्नाचे यथार्थ उत्तर देत आहेत.निर्गुण हे मुख्य सार असून, तेथे सगुण काहीच नसते हे जर खरे आहे, तर मग भजन केल्याचा तरी काय उपयाेग? अव्यक्त सत्य साेडून नाशवंत सगुणाची भक्ती करणे म्हणजेच भजनाचा गलबला करणे व्यर्थच नाही का? ‘ज्ञानी आणि विरागी साधुसंतांनी निर्गुणामुळेच माेक्ष मिळताे हे अनुभवाने सांगितले असताना मग सगुणाने काय मि ळणार? सगुणाेपासनेने येणारे संकट चुकते का? साक्षात्कार हाेताे का? आणि हाेणारे जर चुकणार नसेल, तर मग भजन तरी का करावे?
असे श्राेत्यांच्या मनातील विविध प्रश्न मांडून श्रीसमर्थ या समासाचा प्रारंभ करतात. वक्तृत्वावर श्रीसमर्थांचा माेठा भर आहे. त्यामुळे वक्त्याने श्राेत्यांच्या सर्व शंकांचे यथार्थ उत्तर दिलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे या सर्व शंकांचे निरसन ते अतिशय सविस्तरपणे आणि सामान्यातील सामान्य माणसालाही कळेल आणि पटेल अशा पद्धतीने करतात.गुरुआज्ञा परमार्थात अत्यंत महत्त्वाची आहे व म्हणून मी सांगताे म्हणून तू सगुणभक्ती कर असे जरी गुरूने सांगितले, तरी ते साधकाने ऐकलेच पाहिजे. परंतु त्याहीपेक्षा विचाराने ते पटवून देण्यामध्ये गुरूची थाेरवी आहे, असे सांगूनच श्रीसमर्थांनी हे विवेचन केलेले आहे हे महत्त्वाचे आहे.