गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे

03 May 2023 15:59:23
 
 

Gondavlekar 
 
एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडताेब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले.पुढे काही वर्षांनी त्या दाेघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही.तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलाे हेच विसरलाे आहाेत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलाे आहाेत; ते म्हणजे मनुष्य-देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे हाेय.परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलाे, विषयांतच आनंद मागू लागलाे, आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलाे. पण विषयच जर खाेटे तर त्यांपासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते तेही अंती खाेटेच ठरते ! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते.
 
जिथे विषयविरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात हाेते. नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित हाेणार नाही.त्यासाठी साधन करायला पाहिजे. गुरू तरी काय करताे, तर विषय हे खाेटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही, हेच दाखविताे. म्हणून ताे जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. म्हणून गुरूने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण हाेईल.कितीही साधनाची आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातात, कारण गुरूव्यतिरिक्त जी खटपट ती ारशी उपयाेगाची नसते. गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गाैणपणा दिल्यासारखे झाले! वास्तविक पाहता गुरू हा सर्वज्ञ आहे आणि ताेच प्रत्यक्ष परमात्मा, ही भावना दृढ झाली पाहिजे; ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसताे, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते.
 
गुरू तरी नाम हेच सत्य असे सांगताे, आणि नामस्म रणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देताे. नाम हेच साधन आणि तेच साध्य हाेय हे अक्षरश: खरे आहे. गुरूने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे; जाे असा अनन्यतेने वागताे त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे हाेते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख हाेते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे हाेऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करताे तितकी सर्व जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0