ऐसे ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत ।।1।।‘

24 May 2023 14:23:04
 
 

saint 
 
विमलब्रह्म निरूपण’ या चाैथ्या समासात श्रीसमर्थांनी शुद्ध परब्रह्मस्वरूप पुन्हा विस्तृतपणे सांगितले आहे. श्रीज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, श्रीनामदेव या संतांनी वैराग्य आणि परमार्थावर भर दिला, तर श्रीसमर्थांनी स्वत: प्रपंचाबाहेर असूनही प्रपंच नेटका कसा करावा, स्वधर्म आणि स्वराज्याचे प्रेरणास्वरूप ज्ञान सांगितले आणि मुख्य म्हणजे परमार्थही सुलभरीत्या निरूपण केला. अनेकदा काही अभ्यासक त्यांच्या शिकवणुकीतील प्रपंच व स्वदेशविषयक शिकवणुकीमुळे त्यांच्या परमार्थी संतत्वाविषयी काही शंका घेतात. त्या सर्वांना श्रीसमर्थांचे मनाचे श्लाेक, श्रीदासबाेध आणि आत्माराम या ग्रंथांतून सहजच समर्पक उत्तर मिळते. श्रीदासबाेधात प्रापंचिक, व्यवस्थापनविषयक मार्गदर्शन आहे;
 
पण त्याचा मुख्य भर परमार्थ उपदेशावरच आहे. ताे सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळावा असा सुलभ आहे. शिवाय एकदाच वाचून ताे सर्वांनाच कळणार नाही म्हणून दासबाेधात अनेक वेळा तेच विचार पुन्हापुन्हा आलेले दिसतात. त्या काळास, तेव्हाच्या जनतेच्या मनाेभूमिकेला ही पुनरूक्ती आवश्यकच म्हटली पाहिजे ब्रह्म हे आकाशाप्रमाणे पाेकळ, अरूप आणि विशाल आहे; पण त्याच्याहूनही जास्त निर्मळ आहे. ते सर्व सृष्टी व्यापूनही पुन्हा अनंत असे शिल्लकच राहते. आपण सर्वजण त्या ब्रह्माचेच अंश आहाेत आणि आपल्या सभाेवती ते अनंतरूपात भरलेले आहे. परंतु आपण देहबुद्धीने बांधले गेलाे असल्याने आपणाला त्याचा प्रत्यय येत नाही. ते सर्व विश्वामध्ये कालवले आहे आणि विश्वातील सर्व चराचर सृष्टीमध्ये अंशरूपाने मिसळून गेलेले आहे. मात्र ते एवढे विशाल आहे की, या संपूर्ण सृष्टीतील ब्रह्मरूप हे केवळ त्याचा छाेटासा भाग आहे. सृष्टी ही ब्रह्माची लीला आहे आणि ही सृष्टी त्याचा केवळ अंश आहे.
 
Powered By Sangraha 9.0