शारीरिक तपाचे वर्णन केल्यावर ज्ञानेश्वर वाययीन तप वर्णन करतात.सत्य, प्रिय, हितकर, अभ्यास, स्वाध्याय म्हणजे वाड्मयीन तप हाेय.आपल्या बाेलण्याने इतरांस दु:ख हाेऊ नये असे त्यांचे बाेलणे असते. पाणी मुख्य झाडाला घातले तरी शेजारचे गवत आपाेआपच टवटवीत हाेते, त्याप्रमाणे ताे एकाला बाेलला तरी सर्वांचे हित हाेते.ॠग्वेदादि तीन वेद त्याच्या वाचारूपी मंदिरात स्थापन केलेले असतात. देवाचे नाव त्याच्या वाणीत सतत असते.यानंतर ज्ञानेश्वर मानसतपाचे वर्णन करतात. प्रसन्नता, शांतस्वभाव, माैनवृत्ती, आत्मसंयम, अंत:करणाची शुद्ध स्थिती इत्यादींना मानसतप म्हणतात. लाटांनी सराेवर टाकले, मेघांनी आकाश टाकले, सर्पांनी चंदनाची बागसाेडली, मानसिक चिंतेने राजास साेडावे, त्याप्रमाणे मनातील सर्व संशय दूर हाेऊन ते स्वस्थितीत राहते. मन आपल्या स्वभावास म्हणजे संकल्पविकल्पास मुकते.
थंडीचे अंग थंडीने कसे कापणार? हे तप करणारा मनुष्य शास्त्राचा विचार करताे. त्याच्या इंद्रियांची धाव विषयरूपी गावाकडे जात नाही.तळहाताची केशरहित अवस्था ही जशी स्वाभाविक आहे, त्याप्रमाणे त्याचे मन आपाेआप शुद्ध भावाचे हाेते.अशा प्रकारे तीन तपांचे वर्णन केल्यावर ज्ञानेश्वर सात्त्विक तपाला आणखी महत्त्व देतात. सत्कार, मान, पूजा यांसाठी दांभिक तप करू नये.सन्मानाची अपेक्षा करू नये. पंगतीत पहिला पाट मिळवू नये. ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर दुसऱ्यास विकण्यासाठी शृंगारते, त्याप्रमाणे आपला महिमा वाढविण्यासाठी आपले शरीर व बाेलणे तपाने शृंगारू नये. नाहीतर तपाचे फळ मिळणार नाही.