परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जाे राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध साेडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला साेडीत नाही ही गाेष्ट निराळी.ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले, त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूवर साेपवून तुम्ही माेकळे झाला; गुरुआज्ञापालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही; पण तुम्हाला असे वाटते कुठे? विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीतघातले काय, दाेन्ही त्याज्यच; त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दाेन्ही त्याज्यच.
मी काेण हे आधी जाणले पाहिजे; परमात्मा काेण ते मग आपाेआपच कळते. दाेघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दाेघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे, आणि ताे जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे; म्हणून देहबुद्धी आपण साेडली पाहिजे. काेणतीही गाेष्ट आपण जाणताे म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते, त्याखेरीज जाणणेच हाेत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नकाे का परमात्मस्वरूप व्हायला? यालाच ‘साधु हाेऊन साधूस ओळखणे,’ किंवा ‘शिवाे भूत्वा शिवं यजेत्’ असे म्हणतात. आता, काेणत्याही वस्तूंचा आकार आपल्याला प्राप्त हाेण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत; ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघातरूपाने उद्भूत हाेतात, नंतर त्या वस्तूचे ज्ञान हाेते. म्हणून परमात्मरूपाला विराेधी असे सर्व संस्कार घालवून, आपण आपले अंत:करण पाेषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे.
जर आपण काही साधनाने निष्पाप हाेऊ शकलाे, तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने ताे जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळताे.म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे; त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे? मी सुखाचा शाेध केला आणि ते मला सापडले. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. ताे मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान हाेय. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगताे : तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला साेडू नका.