तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती। आतां नमाे म्हणाे पुढतपुढती। जे बाधका येइजतसे स्तुती। बाेलाचिया ।। 16.17

02 May 2023 15:11:09
 
 

Dyaneshwari 
 
नेहमीप्रमाणे साेळाव्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंना म्हणजे निवृत्तिनाथांना वंदन करीत आहेत. ते असे म्हणतात की, निवृत्तीनाथरूपी एक नवलपूर्ण सूर्य उदयास आला आहे.त्याला आम्ही नमस्कार करताे. हा सूर्य मायारूपी रात्रीचा नाश करताे.ज्ञान व अज्ञान या चांदण्या नाहीशा करताे. ज्ञानी लाेकांना चांगल्या, निरभ्र दिवसाची प्राप्ती करून देताे. याच्या उदयामुळे आत् ज्ञानाची पहाट हाेते. व जीवरूप पक्षी मी देह आहे या समजुतीची घरटी टाकून देतात. या गुरुरूपी सूर्याचा उदय झाल्यावर कमळाच्या पाेटात अडकलेल्या आणि नाश पावणाऱ्या जीवरूपी भ्रमराची देहरूपी कमळातून सुटका हाेते. भेदरूपी नदीवर दाेन्ही काठांनी अडचणीच्या जागा आहेत. या दाेन्ही काठांवर बुद्धी आणि बाेध हे एकमेकांच्यवियाेगाने वेडे हाेऊन चक्रवाकाप्रमाणे ओरडत असतात.
 
त्यांना गुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भाेगविताे. या गुरुरूपी सूर्याच्या उदयामुळे भेदाची चाेरवेळ नाहीशी हाेते. प्रवास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने जातात. ज्ञानाच्या ठिणग्यांमुळे संसारातील जंगले जळून जातात.हा गुरुरूपी सूर्य माध्यान्हकाळी आल्यावर भ्रांती हीच काेणी छाया शिष्याच्या पायांखाली पडून नाहीशी हाेते.म्हणूनच येथे अद्वैतरूप ज्ञाननगरात ब्रह्मानंदाची रेलचेल हाेते. आनंदाच्या अनुभवाची देवघेव कमी पडते. असा हा श्रीगुरूआत्मस्वरूपी आकाशाचा राजा आहे. ताे उगवल्यावर उदय-अस्त, दिसणे, न दिसणे हे सर्व दूर हाेते. रात्र व दिवस या द्वंद्वापलीकडे ताे जाताे.आत्मप्रकाशाचा सुकाळ हाेताे. हा ज्ञानरूप सूर्य भाग्यवानांना पहावयास मिळताे. श्रीगुरूंच्या रूपाची शब्दांनी केलेली ही स्तुती बाधक हाेऊ नये म्हणून मी ज्ञानेश्वर त्यांना वारंवार नमस्कार करताे.
Powered By Sangraha 9.0