सत्त्वगुणांचे माहात्म्य ध्यानात ठेवण्यासाठी ज्ञानेश्वर तम या गुणाचे विशेष वर्णन करतात. तमाेगुणी मनुष्य आदल्या दिवशी शिजविलेले अन्न किंवा अर्धवट शिजविलेले खाताे. पक्वान्नास घाण सुटेपर्यंत ताे हात लावत नाही. अन्न तयार हाेऊन पुष्कळ दिवस झाले की त्याला ते गाेड लागते. तमाेगुणी मनुष्य बायकाेबराेबर तिच्या ताटात बसून एकत्र जेवताे.त्याला मद्याची रुची असते.जेवण्याची त्याची आवड विशेष असते. त्याचे ताेंड नेहमी अपवित्र अन्नाला शिवते. शिरच्छेद हाेण्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागताे का ? पण तमाेगुणी पुरुष हा परिणाम सहज सहन करताे. आहाराप्रमाणेच यज्ञाचेही तीन प्रकार आहेत. अर्जुना, प्रथम सात्त्विक यज्ञाचे महत्त्व ऐक. समाधानयुक्त अंत:करणाने जाे यज्ञ केला जाताे ताे सात्त्विक यज्ञ हाेय. पतिव्रता स्त्री इतरांच्यापासून कामेच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा करीत नाही.
समुद्राला मिळाल्यावर गंगासुद्धा पुढे जात नाही.त्याप्रमाणे आपल्या हितासाठी चित्तवृत्ती याेजून कर्माच्या फळाविषयी कर्तेपणाचा अभिमान सात्त्विक माणसात उरत नाही. देह व मन यांनी यज्ञाचा निश्चय केलेला असताे.झाडाच्या मुळाशी गेल्यावर पाणी जसे मागे सरत नाही.तसेच याचे असते. फलाची अपेक्षा साेडून सर्व अंगांनी परिपूर्ण असा यज्ञ ते करतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपण पाहताे.अंधारात तळहातावरील रत्न दिव्याने पाहिले जाते. सूर्य उगवला की, सर्व वाटा आपल्या दृष्टीच्या टप्प्यात येतात.अंगावरील सर्व अवयवांवर याेग्य ते अलंकार घालावेत, त्याप्रमाणे ताे यज्ञाची उपासना सर्व अंगांनी करीत असताे.तुळशीचे आपण रक्षण करताे, पण तिच्यापासून फळांची, छायेची अपेक्षा आपण धरत नाही.