असेच म्हटले पाहिजे... ‘शुद्ध’ काेणत्या जागेला म्हणायचे? जिथं बसून आपण कधी वाईट विचार केला नाही, जेथे आपण काेणतंही दुष्कर्म केलं नाही, जिथं बसून आपण परमात्म-स्मरणं, ध्यान, प्रार्थना, पूजा याशिवाय आणखी काहीही केलेलं नाही, ज्या जागी जाण्यापूर्वी आपण आपल्या साऱ्या क्षुद्रता बाहेर साेडून दिल्या, असा एक छाेटासा काेपरा.. आणि असा काेपरा निश्चितच निर्मित हाेऊन जाताे आणि जर याच ठिकाणी शेकडाे जणांनी प्रयाेग केला असेल तर त्याची शुद्धता हळूहळू घनीभूत हाेत जाते, क्रिस्टलाईज हाेत जाते. याच जगात ती एक अलग दुनिया उभी राहते. ते एक वेगळं ठिकाण हाेऊन जातं, जिथे प्रवेश करताच परिणाम हाेणं सुरू हाेतं.तिथं कुणी अनाेळखी माणूस जरी आला तरी त्याच्यावर सुद्धा परिणाम व्हायला लागताे.
कित्येक वेळा आपणाला असा अनुभव आला असेल, किंवा याच्या उलट अनुभव आला असेल. पण हा मुद्दा आपल्या लक्षात तर येईल.. कित्येकदा आपल्याला असा अनुभव आला असेल की एखाद्या घरी प्रवेश करताच तिथे कुठे तरी बसताच मन फार वाईट विचारांनी भरून जातं. एखाद्या माणसाजवळ जाताच मन दुष्कर्माच्या वासनांनी अगदी भरून जातं. याच्या उलट मात्र फारसं अनुभवाला आलं नसेल, कारण याच्या उलट प्रकारची माणसं फार कमी असतात. ज्याच्याजवळ गेल्यास मन आकाशात भराऱ्या मारू लागेल, अशी माणसं, अशा जागा फार कमी आहेत. तिथं गेलं की मन जमीन साेडून देतं. क्षुद्रापासून बाजूला हाेतं, विराटाची यात्रा करू लागतं. जिथं अंतर्यात्रा साेपी हाेऊन जाईल ताे सत्संग, तेच दर्शन. अशाप्रकारे काेणाच्या तरी जवळ जाणे याचं जुनं नाव सत्संग असं हाेत