संसाराच्या मायाजाळात अडकलेला जीव अनेक वेळा अनेक प्रकारचे निश्चय करताे.निश्चयाप्रमाणे वागण्याची वेळ आली की सहजपणे निश्चयापासून माघारही घेताे. स्वत:च निर्णय घ्यायचा किंवा स्वत:च निश्चय करायचा आणि स्वत:च त्यापासून दूर जायचे, हे याेग्य नसले तरी अनेकांकडून हे सहज घडत असते.मनाची अस्थिरता हे यामागचे प्रमुख कारण असते.चंचल मन ताब्यात न घेता आपण स्वत:लाच त्याच्या ताब्यात देताे. त्यामुळे निश्चयापासून, निर्णयापासून परावृत्त हाेण्याची वेळ आपल्यावर येते;
पण संत महात्म्यांच्या बाबतीत असे घडत नाही. ते काेणत्याही परिस्थितीत याेग्य निर्णय, निश्चयापासून माघार घेत नाहीत.आपणाला जीवन म्हणजे नेमके काय? आपला अधिकार काेठपर्यंत चालताे? या प्रश्नांची खरी उत्तरे मिळाली असल्याने नाशवंत देहावरील माेह साेडण्यात आपण यशस्वी झालाे. देहाचाच माेह सुटल्याने ईर्षा, द्वेष, अहंकार, काम, क्राेध, लाेभ, मत्सर इत्यादी आपल्या आड येत नाहीत. त्यामुळे समता, बंधुता, निःस्वार्थ प्रेम, कर्तव्य आदींची याेग्य प्रकारे जपणूक करण्याचा आपला निश्चय कायम आहे, असे महाराज म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448