साधकाची लक्षणे सांगून झाल्यानंतर आता ज्ञानप्राप्तीच्या सर्वाेच्च काेटीची म्हणजे सिद्धावस्थेची वर्णना श्रीसमर्थ या पाचव्या दशकाच्या दहाव्या ‘‘सिद्धलक्षण’’ समासांत करीत आहेत. अंगात ब्रह्मज्ञान पूर्णपणे मुरल्यानंतर आणि ते सदासाठी स्थिर झाल्यानंतरच सिद्धावस्था प्राप्त हाेते. साधक हा बहुतेकवेळा बराेबर असताे; पण कधीतरी चुकूही शकताे तर सिद्धाचे आत्मज्ञान पूर्णत्वाच्या अशा पातळीवर गेलेले असते की, ताे स्वस्वरूपी सदैव स्थिरचित्त असताे.सर्वसामान्य संसार करणाऱ्यांनासुद्धा ही सिद्धावस्थेइतकी प्रगती करणे निश्चितपणे शक्य आहे असा विश्वास देऊन श्रीसमर्थ म्हणतात की, त्यासाठी निश्चयाने अवगुणांचा आणि ऐहिकाचा त्याग करून सन्मार्ग धरला पाहिजे.
प्रपंच करतानाही आपणाला त्याग करावा लागताेच. मुलाला बरे नसले तर आईला झाेपेचा त्याग करून त्याची शुश्रूषा करावी लागते.
नाेकरीवर जायचे तर घरी आराम करण्याचा त्याग करावा लागताे. पण परमार्थ मार्गातील त्याग याहून वेगळा म्हणजे देहाेपभाेगाचा, विषय सुखाचा आणि स्वार्थाचा त्याग आहे आणि त्याचबराेबर सत्य ज्ञानाचा मार्ग धरून त्याच्या प्रयत्नपूर्वक अभ्यासाची जाेडही त्याला आवश्यक आहे. असे झाले तर प्रापंचिक बद्धही मुमुक्षू, साधक या मार्गाने सिद्धावस्था निश्चितपणे प्राप्त करू शकेल.