जे ज्ञानाने जाणावयाचे ते ब्रह्म कसे आहे? याचे विवेचन ज्ञानेश्वर या ओवीत करीत आहेत.त्याला सर्वत्र हातपाय आहेत.त्याचे डाेळे, त्याचे शिर, त्याचे मुख आणि कान सर्वत्र आहेत.ते विश्वाला व्यापून राहिलेले आहेत. म्हणून त्याला विश्वबाहू म्हटले आहे.विश्वचक्षू असे त्याचे नाव आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्व वस्तूंत मिळून असते, त्याप्रमाणे शब्दमात्राच्या ठिकाणी त्याचे कान असतात. ते विश्वमूर्धा असल्याकारणाने त्याची सर्वत्र मस्तके आहेत. ते सर्व पाहणारे असल्यामुळे त्याला विश्वचक्षू असे श्रुतीने म्हटले आहे. एरवी ब्रह्म हे शून्याचाच शेवट आहे. हेही सहन हाेत नाही, तेथे त्याचे हात, पाय, डाेळे, कान यांचे बाेलणे काेठून येणार? ज्ञानेश्वर महाराज या कल्पनेचे विवरण करताना एक दृष्टांत देतात की, शून्य म्हणजे काही नाही, असे असले तरी एक बिंदुला काढावेच लागते.
त्याप्रमाणे अद्वैत शब्दांनी ज्याचे वर्णन करावयाचे, त्याला द्वैताचा आधार घ्यावा लागताे. नाहीतर अर्जुना, गुरुशिष्यांच्या मार्गाला माेठाच अडथळा येऊन बाेलणे खुंटेल. असे हे ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे.अवकाशाच्या ठिकाणी ते आकाश म्हणून आहे.वस्त्रांमध्ये तंतूंच्या रूपाने आहे. पाण्यामध्ये रस, दिव्यामध्ये तेज, कापरामध्ये सुगंध आणि शरीरामध्ये कर्म त्याच्या रूपाने प्रकट हाेते.हे ब्रह्म मनासारख्या इंद्रियांमध्ये गुणरूपांनी दिसते हे खरे, पण गुळाची गाेडी जशी ढेपेत असली तरी ती ढेपेच्या आकारासारखी नसते.त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खराेखर नसतात. दुधाच्या अवस्थेत तूप हे असतेच, पण दूध मात्र तूप नसते. अलंकारांना विविध नावे असली तरी साेने एकच असते.