अज्ञानी माणसाचे धर्मकृत्य कसे असते, ईश्वरभक्ती कशी असते, याचे वर्णन या ओवीत ज्ञानेश्वर करीत आहेत. जसे एखाद्या कुलदेवतेला भजावे त्याप्रमाणे ताे स्त्रीची उपासना करताे. जे-जे चांगले ते-ते सर्व स्त्रीला अर्पण करताे. कुटुंबातील इतरांची पर्वा करीत नाही. पत्नीला काेणी वाकडे बाेलणार नाही याची काळजी सतत त्याला असते. त्याचे सर्वस्व काय ते त्याची स्त्री व तिच्यापासून झालेली मुले एवढेच असते.तिचेच नातेवाईक त्याला महत्त्वाचे वाटतात. खवळलेल्या सागरात माेकळी नाव जशी झाेके खाते, त्याप्रमाणे त्याचे आयुष्य असते. आवडती वस्तू प्राप्त झाली की त्याला सुख हाेते आणि प्राप्त झाली नाही की ताे कष्टी हाेताे. सुखदु:ख यांच्या आवर्तात ताे असताे.ईश्वराची भक्ती ताे सकाम भावनेने करताे. फळाच्या वधनाच्या लाेभाने ताे वैराग्य धारण करताे.
जाराकडे जाण्यासाठी जारिणी जशी पतीच्या मनाप्रमाणे वागते, त्याप्रमाणे माझ्या भजनाविषयी त्याला वाटते. एखाद्या अडाणी पुरुषाप्रमाणे ताे राेज नव्या देवांच्या शाेधात असताे. ज्या गुरूचा थाटमाट माेठा त्याचा मंत्र ताे घेताे. ताे काेणाशीच एकनिष्ठ नसताे.
ताे माझी मूर्ती करताे, तिला काेपऱ्यात बसवताे आणि आपण मात्र गावाेगावी तीर्थयात्रेला जाताे. घरात माझी स्थापना करून व्रते मात्र इतर देवतांची करताे.एकादशीच्या दिवशी जेवढा मान आम्हाला असताे, तेवढाच नागपंचमीच्या दिवशी नागाला ताे देताे. चतुर्थीस गणपतीची पूजा करताे. आणि मंगळवारी दुर्गेचे स्तवन करताे. नित्यकर्मे साेडून नवचंडीचे अनुष्ठान करताे. रविवारी भैराेबाला जाताे.
साेमवारी शंकराला बेल वाहताे. अशी याची भक्ती असल्यामुळे गावातील एखादी वेश्या जसे राेज नवे घर धुंडते त्याप्रमाणे असते.