संत आत्मज्ञानाचा उपदेश करतात, चिरकाल टिकणारे सत्य व नाशवंत ऐहिक जग यातील भेद स्पष्ट करून सांगतात. त्या उपदेशाने साधकाचे संशय नाहीसे हाेऊ लागतात. ताे नाना ग्रंथांचा धांडाेळा घेऊ लागताे. देहबुद्धी साेडून देऊन आत्मानंदाचा शाेध घेऊ लागताे. कीर्तन-भजन यामध्ये सहभागी हाेऊन श्रवणभक्तीही करीत राहताे.मनामध्ये लाेप पावलेले आत्मज्ञान जागृत करून विवेक व वैराग्याने ब्रह्मज्ञानाला प्राप्त हाेताे. अंगातील दाेष टाकून देऊन त्यांच्या जागी सद्गुणांची प्रतिष्ठापना करताे. वाईट कर्मे साेडून सत्कर्मे करू लागताे. अशा रीतीने सततच्या प्रयत्नाने त्याचे सर्व अवगुण जाऊन ताे उत्तम गुणांनी मंडित हाेऊ लागताे. खरा मी म्हणजे हे शरीर नसून त्यावेगळा वसणारा परमतत्वाचा अंशरूप असा आत्मा आहे. हे
तत्व त्याच्या हृदयात स्थिर हाेऊ लागतअशा मार्गाने जाऊन ताे दिसणारे जग हे सत्य नसून ताे केवळ सत्याचा आभास असे मायारूप आहे, हे जाणून ते अलक्ष म्हणजे मनातून काढून टाकताे आणि त्याच्या जागी जे दिसत नाही अशा परमतत्वावर मन आणि बुद्धी केंद्रित करून त्याची अंतरात स्थापना करताे. इंद्रियांना न दिसणाऱ्या या आत्मरूपांत ताे पूर्णपणे विलीन हाेताे. असा साधक स्वत:चे खरे स्वरूप जाणून त्या स्वस्वरूपातच स्थिर हाेऊन जाताे. अशी साधकावस्था लाभणे हे भाग्याचेच लक्षण आहे. मात्र त्यासाठी मुमुक्षूची तळमळ व दृढ भाव आवश्यक आहेत.अनेकदा मुमुक्षूंच्या मनात मला ही साधना साधेल का? अशी शंका येते. अशांना श्रीसमर्थांनी जाे जाे मनाेभावे प्रयत्न करेल त्याला ही साधना आणि साधकपद निश्चितपणे प्राप्त हाेते, असा विश्वास दिला आहे.
-प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299