श्रीसमर्थ श्राेत्यांचे मानसशास्त्र उत्तम जाणणारे हाेते. ‘तुटे वाद संवाद ताे हितकारी’ म्हणणाऱ्या श्रीसमर्थांनी या ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यातील वादविवादाद्वारेच तत्त्वबाेधाचे निरूपण केले आहे. ते पुढे म्हणतात की, ज्ञानी माणसाच्या या बाेलण्यावर अज्ञानी त्याला विचारताे की, मग असे आहे तर तू गुरुभक्ती आणि तीर्थयात्रा कशाला करताेस? यावर ज्ञानी सांगताे की, भावातीत आणि गुणातीत सद्गुरू शाेधून त्यास शरण गेल्यानंतर ताे परमात्मरहस्य जाणत असल्याने त्याच्या कृपेनेच हे ज्ञान प्राप्त हाेते. अज्ञानीही वादाला पेटला असल्याने गप्प न बसता ताे म्हणताे की, हे सर्व विश्व माझाच अंश आहे, असे गीतेमध्ये साक्षात गाेविंद म्हणाला आहे. तेव्हा हे सांगणाऱ्या भगवंतालाच अज्ञानी असे म्हणावे? आता यावर ज्ञानी माणसाचे उत्तर मनन करण्याजाेगे आहे. ताे म्हणताे, गीतेमध्ये भगवंत वृक्षामध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे असे म्हणाला आहे. ताे ताेडला तर सहज तुटताे;
पण गीतेतच भगवंताने आत्म्याला शस्त्रे ताेडू शकत नाहीत,अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू आणि वारा हलवू शकत नाही असेही सांगितले आहे.पिंपळ तुटताे, जळताे, भिजताे आणि वाऱ्याने गदागदा हलूही शकताे. तेव्हा सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त केले म्हणजेच या विराेधाभासाचा खरा अर्थ जाणता येऊन परमेश्वराची ओळख हाेऊ शकते.असा विवाद रंगवल्यानंतर श्रीसमर्थ म्हणतात की, भगवंताने मन हेच आपले स्वरूप असल्याचेही सांगितले आहे. मग मनाची ऊर्मी आवरली पाहिजे हे कसे हीही शंका श्राेत्यांना येईल. याचे उत्तर ते साेप्या उदाहरणाने देतात आणि म्हणतात की, लहान मुलाला खडे मांडून गणित शिकविण्याचा प्रारंभ आई करते त्याप्रमाणे ‘खडे मांडूनि सिकविला । ओनामा जेवी ।।, अशा पद्धतीनेच भगवंताने सत्य, परमात्मा आणि असत्य सृष्टी यांचा परस्परसंबंध सांगितला आहे. ते सूत्र केवळ देहबुद्धीच्या ज्ञानाने समजणारे नाही म्हणूनच सद्गुरूची आवश्यकता आहे ! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299