या संसार वृक्षाच्या ठिकाणी आपणच कसे भरून राहिलेलाे आहाेत. हे श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहेत. आदित्याच्या ठिकाणचे तेज आपणच आहाेत. चंद्राचे शीतलत्व आणि अग्नीचा दाहकपणा आपणच आहाेत. श्रीकृष्ण म्हणतात की, मीच पृथ्वीवरील भूतांना धारण करताे. रसात्मक चंद्र हाेऊन सर्व वनस्पतींचे पाेषण मीच करताे. एवढेच नव्हे तर देहाचा आश्रय करून राहिलेले प्राण व अपान वायू यांनी युक्त हाेऊन मीच जठाराग्नी हाेताे. आणि शुष्क, स्निग्ध, पक्व, विदग्ध अशा प्रकारचे अन्न पचविताे. याप्रमाणे अर्जुना, अन्न पचविणारा पाेटातील अग्नी मीच आहे. सर्व प्राण्यांना जगवणारे जीवन मीच आहे. सर्व विश्वात माझ्यावाचून दुसरे काेणी नाही. मीच सर्व ठिकाणी आहे. असे असले तरी या जगात काही प्राणी सुखी व काही दु:खी का दिसतात?
असे तर्क वितर्क तुझ्या मनात आले तर तू त्यांचे निवारण करून घे. सर्व मीच आहे हे खरे, पण ज्याचे अंत:करण शुद्ध वा अशुद्ध असेल त्याप्रमाणे त्याला सुखदु:ख हाेईल. आकाशध्वनी एकच. पण त्याचे नाद विविध रूपांनी बाहेर पडतात. उगवलेला सूर्य एकच असताे, पण ताे लाेकांना विविध प्रकारांनी उपयाेगास येताे. पाणी एकच असते, पण ते निरनिराळ्या झाडांच्या मुळांना जाऊन विविध प्रकारच्या रसांचे पाेषण करते.त्याप्रमाणे सर्व जीवांच्या ठिकाणी मीच असून निरनिराळ्या प्रकारांनी प्रकट झालाे आहे. नीलमण्यांचा हार हा अज्ञानी माणसाला सर्प वाटताे. ज्ञानी माणसाला हार वाटताे. स्वाती नक्षत्राचे पाणी एकच असते. पण ते शिंपल्यात पडले की त्याचे माेती हाेतात. सर्पात विष हाेते, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला सुख व अज्ञानी माणसाला दु:ख हाेते.