एकवेळे प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडण ।।2।।

25 Apr 2023 15:41:27
 
 

saint 
 
आपल्यात निर्माण झालेल्या विकाराला नष्ट करण्यासाठी प्रत्यक्षात वस्तरा हाती घेऊन प्रायश्चित्त करावे लागत नाही, तर केवळ मनाचा दृढनिश्चय करावा लागताे.अडकलेल्या विकारातून मनाला बाहेर काढावे लागते. इंद्रिय लळ्यावर पूर्णत: नियंत्रण आणावे लागते. देह म्हणजे मी ही मनाेवृत्ती नष्ट करावी लागते. भाैतिक सुखाभाेवती फिरणाऱ्या मनाला शाश्वत सुखाची जाणीव करून द्यावी लागते.आपल्याकडून आजपर्यंत झालेल्या चुकांची आठवण करून त्या पुन्हा न करण्याचा दृढनिश्चय करणे म्हणजेच नाशवंत सुखाला खरे सुख न मानण्याची मनाेवृत्ती तयार करणे हे एक प्रकारचे प्रायश्चित्त हाेय. नाशवंत व भाैतिक सुखाला आपल्या मनातून कायमचे काढून टाकणे म्हणजे विविध प्रकाराच्या विकारांचे मुंडण करणे हाेय. आपण बुद्धिजीवी प्राणी असल्याने चांगल्या वाईटातील फरक आपणाला कळताे. पण, प्रश्न फक्त वळण्याचा असताे. जेव्हा आपण चांगल्या मार्गाकडे वळण्याचा दृढनिश्चय करू आणि त्याप्रमाणे वागू तेव्हा चित्ताच्या स्थिरतेसाठी वेगळे कांही करावे लागणार नाही.जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0