परब्रह्म हे काळातीत आणि अचल स्थिर आहे याचे विवरण करणारा हा ‘ब्रह्मनिरुपण’ समास आहे. या समासाची सुरुवात श्रीसमर्थ शास्त्रामधील कालगणना स्पष्ट करून करतात.कृत युगाची सतरा लाख अठ्ठावीस हजार, त्रेतायुगाची बारा लाख शहाण्णव हजार, द्वापार युगाची आठ लाख चाैसष्ट हजार आणि कलियुगाची आतापर्यंतची चार हजार सातशे साठ इतकी वर्षे हे विश्व अस्तित्वात आहे.
मात्र एवढी वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाच्या कालगणनेचा जवळ जवळ एक दिवस हाेताे. असे हजार दिवस म्हणजे विष्णूची एक घटिका हाेते तर अशा हजार घटिकांमुळे महादेवाचे एका पळभराचा काळ हाेताे आणि अशा हजार पळांचे मिळून आदिशक्तीचे अर्धे पळ हाेते असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात परब्रह्मामध्ये अशा अनेक आदिशक्ती आहेत यावरून परब्रह्माचे विशाल स्वरूप आणि कालातीतपणा लक्षात येईल.
अशा अनेक रचना येतात आणि जातात परंतु परब्रह्म आहे तसेच अखंड आणि निश्चल राहते. म्हणून खरे म्हणजे स्थिती किंवा कालगणना ही इतर सर्वांना लागू हाेत असली तरी परब्रह्माच्या बाबतीत तिचा विचारही अशक्य आहे असे वेद आणि श्रुतींनीही सांगितले आहे. म्हणजेच परब्रह्माची स्थिती हा शब्दप्रयाेगच चुकीचा आहे. कारण त्यात बदल हाेत नाही असे ते अविचल आहे. त्याची स्थिती पालटत नाही ही केवळ आपली सामान्य माणसांची बाेलायची रीत आहे एवढेच! परब्रह्माने आपली माया म्हणून निर्माण केलेल्या या विश्वात अनेक चराचर वस्तू नांदत असतात व त्यास काेणी हे थाेर तर काेणी ते माेठे असे म्हणत राहतात.